बेळगावमध्ये अलीकडे अनेक चित्रविचित्र घटना घडत आहेत. याचाच एक भाग म्हणजे शहरात आढळून आलेला बिबट्या! गेल्या २ आठवड्यापासून गोल्फ कोर्स मैदान परिसरात तळ ठोकून बसलेला बिबट्या दहशतीचे कारण बनला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभाग शर्थीचे प्रयत्न करत आहे.
या परिसरात वावरणाऱ्या नागरिकांना जिल्हा प्रशासन आणि वनविभागाने खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. बिबट्याच्या धास्तीने या भागातून जा-ये करणाऱ्या नागरिकांना अनाहूत भीती लागली असून एकट्या दुकट्याने या मार्गावरून मार्गस्थ होताना जळी-स्थळी-काष्टी-पाषाणी बिबट्याचा भास होत आहे!
ही सारी भयावह परिस्थिती असूनही सेंट झेवियर्स ते हिंडलगा गणपती पर्यंतच्या मार्गावर रात्रीच्या वेळी मार्गस्थ होताना भयावह आभास निर्माण होत आहेत. सेंट झेवियर्स, गांधी चौक मार्गे शौर्य चौक पर्यंतचा मार्ग आणि गांधी चौक ते हिंडलगा गणपती मंदिर या भागात रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे आणि पथदीपांचीही व्यवस्था नाही.
सेंट झेवियर्स शाळेसमोरून मार्गस्थ होताना गांधी चौक पर्यंत संपूर्ण रस्त्यावर अंधार पसरला आहे. या भागात बिबट्या तर दूरच समोर एखादा खड्डा जरी आला तरी नागरिकांना समजणार नाही, अशी परिस्थिती या भागात निर्माण झाली आहे. एखादा भयपट पाहावा अशा पद्धतीने या मार्गावर प्रत्येकाला अनुभव येत आहे.
वाहन धारकांना या मार्गावरून मार्गस्थ होताना केवळ रस्त्याचीच नाही तर बिबट्याचा दहशतीमुळे चारीबाजूला लक्ष ठेवून वाहन चालविण्याची वेळ आली आहे. एका बाजूला बिबट्या, दुसऱ्या बाजूला अंधार आणि यात धास्ती मनात ठेवून मार्गस्थ होणाऱ्या वाहनधारकांना अपघाताचाही धोका आहे.
आधीच बिबट्याच्या दहशतीने उडालेली नागरिकांची घाबरगुंडी आणि या भागात असलेली मूलभूत सुविधांची कमतरता, यामुळे ‘आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या साऱ्या परिस्थितीचा विचार करता ज्या पद्धतीने युद्धपातळीवर मिशन बिबट्या शोध मोहीम प्रशासन राबवत आहे त्याच धर्तीवर या भागात तातडीने पथदीपांची सोय करणे अत्यावश्यक आहे.