Saturday, January 11, 2025

/

‘या’ ग्रामपंचायतीने केली कायमस्वरूपी पीडीओची मागणी

 belgaum

आंबेवाडी ग्रामपंचायतला कायमस्वरूपी पीडीओ नसल्यामुळे कामगार -कर्मचाऱ्यांचे पगार प्रलंबित राहण्याबरोबरच विकास कामेही रखडली आहेत. तेंव्हा या ग्रामपंचायतीसाठी कायमस्वरूपी पीडीओंची नियुक्ती केली जावी, अशी मागणी आंबेवाडी ग्रामपंचायतीतर्फे जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवानेते आर एम चौगुले व आंबेवाडी ग्रा. पं. अध्यक्ष चेतन पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंबेवाडी ग्रा. पं. सदस्यांनी आज सोमवारी दुपारी उपरोक्त मागणीचे निवेदन जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) दर्शन एच. व्ही. यांना सादर केले.

त्यांनी निवेदनाचा स्वीकार करून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी ग्रामपंचायतला गेल्या तीन-चार महिन्यापासून पंचायत विकास अधिकारीच (पीडिओ) नाही. या पंचायतीला सध्या जे पीडीओ आहेत ते प्रभारी असून त्यांच्याकडे दोन ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे.

त्यामुळे सदर पीडीओ आंबेवाडी ग्रामपंचायतसाठी वेळ देण्यास तयार नाहीत, ते या ठिकाणी फिरकतही नाहीत. परिणामी गेल्या सुमारे 6 महिन्यांपासून या ग्रामपंचायतीसाठी काम करणाऱ्या कामगार आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाही. ग्रामपंचायत हद्दीतील विकास कामे रखडली आहेत. जी कामे झाली आहेत त्यांची बिले काढण्यात आलेली नाहीत. कारण त्यावर पीडिओच्या स्वाक्षऱ्या नाहीत.

याव्यतिरिक्त आंबेवाडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आंबेवाडीसह गोजगा व मण्णूर अशी तीन गावे येतात. या गावातील स्वच्छतेची कामे ठप्प झाल्यामुळे सर्वत्र अस्वच्छतेचे वातावरण निर्माण आहे. यामुळे या गावांमध्ये मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यासारख्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. गोजगा येथे डेंग्यूचे सहा रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. निधीच उपलब्ध करून दिला जात नसल्यामुळे या तीनही गावातील गटारे व कचऱ्याची साफसफाई झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार निधी बिलांसाठी अध्यक्षांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत, परंतु पीडीओ स्वाक्षरी करण्यास तयार नाहीत.Tp bgm mannur

सध्याचे पीडिओ मागील पीडीओंच्या कारकिर्दीतील कामांच्या व पगाराबाबत आपल्याला काही माहीत नसल्यामुळे त्या बिलांवर आपण स्वाक्षरी करणार नाही असे स्पष्टपणे सांगत आहेत. यावर मागील पीडीओंकडून पदभार स्वीकारताना सर्व गोष्टींची शहानिशा करणे हे सध्याच्या पीडीओंचे कर्तव्य होते असे ग्रामपंचायत सदस्यांचे मत आहे. एकंदर विद्यमान प्रभारी पीडिओ प्रत्येक बाबतीत असहकाराची भूमिका घेत असल्यामुळे विकास कामे रखडण्याबरोबरच पगारा अभावी कामगार व कर्मचाऱ्यांची कुचंबना होत आहे.

याची गांभीर्याने दखल घेऊन आंबेवाडी ग्रामपंचायतीवर तात्काळ कायमस्वरूपी पीडीओची नियुक्ती करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन सादर करतेवेळी समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले, ग्रा. पं. अध्यक्ष जैतन पाटील, ग्रा. पं. सदस्य दत्तू चौगुले, मधुकर चौगुले, नागेश चौगुले, अर्जुन राक्षे, नारायण लोहार, शंकर सुतार आदिंसह महिला ग्रामपंचायत सदस्या उपस्थित होत्या.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.