बेळगाव लाईव्ह/क्रीडादिनविशेष: प्रेक्षकांच्या जोरदार टाळ्या, शिट्ट्या मिळवत उत्कंठा शिगेला पोहोचविणारा मर्दानी खेळ म्हणजे कुस्ती! कुस्ती हा गावाकडचा खेळ! मात्र हा खेळ सातासमुद्रापलीकडे खेळला जातो. प्राचीन आणि राजा – महाराजांच्या काळापासून खेळल्या जाणाऱ्या या खेळाला ‘मल्ल युद्ध’ म्हणून ओळ्खले जायचे. या खेळासाठी प्रचंड ताकद तर महत्वाची असतेच, मात्र याचबरोबर चपळ आणि वेगवान बुद्धिमत्तेचीही गरज असते.
मर्दानी खेळ समजल्या जाणाऱ्या या खेळात आज अनेक मुली, महिलांनी आपला झेंडा रोवलाय. दुर्बल आणि दुर्लक्षित समजणाऱ्या स्त्रियांनी कुस्तीसारख्या बळकट क्षेत्रात आपले नाव कोरले आहे. संजना बागडी, अश्विनी बोऱ्हाडे, कौशल्यं वाघ, रेश्मा माने, स्वाती शिंदे, नंदिनी साळोखे, गीता फोगाट, बबिता फोगाट, साक्षी मलिक हि काही कुस्ती क्षेत्रातील उदाहरणे आहेत. अशा कितीतरी मुली आज कुस्तीच्या आखाड्यात आपलं अस्तित्व सिद्ध करत आहेत.
बेळगावचीही एक चिमुरडी याच हिमतीने कुस्तीच्या आखाड्यात पाय रोवून उभी आहे. वय वर्षे अवघे १४ मात्र दिल्ली, रोहतक, झारखंड, पाटणा यासह देशभरातील अनेक राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीस्पर्धेत आपले नाव कोरणाऱ्या राधिका बस्तवाडकर हिची बातच न्यारी!
मूळची संतीबस्तवाड (ता. बेळगाव) येथील अवघ्या १४ वर्षांची राधिका शालेयस्तरावरील जिल्हा, राज्य, आंतरराज्य, राष्ट्रीय कुस्तीस्पर्धेत हिरीरीने सहभाग घेते. ‘कुस्ती हे बाईचे क्षेत्र नव्हे’ असे म्हणणाऱ्या अनेक जणांसाठी राधिकाची जिद्द हि प्रत्त्युत्तरादाखल घेतली जावी इतकी कणखरपणाने आतापासूनच राधिका या क्रीडाप्रकारात स्वतःला झोकून देत आहे. कर्नाटकातील अनेक जिल्हे, झारखंड येथील रांची, बिहार – पाटणा, रोहतक-हरियाणा, यासह अनेकठिकाणी राधिकाने आपल्या कुस्तीचे खेळ दाखविले आहेत.
राधिका रामदास बस्तवाडकर हिला तिच्या आई-वडिलांचे मोठे पाठबळ आहे. सिद्धरामेश्वर हायस्कुल येथे सहावीत शिकणाऱ्या राधिकाला अनेक कुस्तीच्या आखाड्यात विविध पारितोषिके मिळाली आहेत. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, वीर स्वामी विवेकानंद केसरी, श्री वि आर देशपांडे मेमोरियल ट्रस्ट, डिपार्टमेंट ऑफ पब्लिक इंस्ट्रक्शन ऑफ कर्नाटक यासारख्या अनेक संस्था, सरकारी क्रीडा संस्थांकडून पारितोषिके मिळाली आहेत.
आजवरच्या यशात तिला तिच्या प्रशिक्षकांचेही उत्तम मार्गदर्शन मिळत आहे. बेगडी रंग जोपासणाऱ्या या जगात आतापासूनच तालमीत तयार होऊन उद्याच्या दृष्टिकोनातून स्वसंरक्षणासह देशाचे नाव उज्वल करणाऱ्या राधिकासारख्या अनेक मुली आणि त्यांचे पालक आशेचा किरण आहेत…
देशातील विकासकामांची शाश्वती आपण देऊ शकत नाही मात्र राधिका आणि राधिकासारख्या असंख्य मुलींमुळे उद्याच्या विकसित भारताची शाश्वती आपण नक्कीच देऊ शकतो, हे नक्की… राधिका बस्तवाडकर हिच्या पुढील प्रवासासाठी टीम बेळगाव लाइव्हच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
*राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने….!*