बेळगाव लाईव्ह/क्रीडादिनविशेष: ऑलिम्पिक खेळांमधील ऍथलेटिक्स प्रकारात येणार लांब उडी या प्रकारात भारताने अनेक विक्रम नोंदविले आहेत. आजकाल, नॉर्वे हा एकमेव देश आहे जिथे उभी लांब उडी ही राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा म्हणून घेतली जाते. लांब उडी आणि उंच उडी मधील नॉर्वेजियन चॅम्पियनशिप 1995 पासून प्रत्येक हिवाळ्यात स्टॅंजमध्ये आयोजित केली जाते.
ऑलिम्पिक मधील ऍथलेटिक्स प्रकारात मोडणाऱ्या या क्रीडाप्रकारात बेळगावमधील क्रीडापटूही अव्वल कामगिरी बजावत आहे. जाफरखान सारवार असे या क्रीडापटूचे नाव असून गांधीनगर येथे राहणाऱ्या जाफरखान याने आजवर लांब उडी या क्रीडा प्रकारात अनेक पारितोषिके पटकाविली आहेत. भरतेश शैक्षणिक संस्थेत कला शाखेत पदवी शिक्षण घेणाऱ्या जाफरखान या क्रीडापटूने आजवर ४ सुवर्ण, २ रौप्य आणि ३ कांस्य पदकावर आपले नाव कोरले आहे.
प्रदीप जुवेकर, आकाश मंडोळकर, शिरीष सांबरेकर या प्रशिक्षकांची मोलाची साथ आणि मार्गदर्शन यामुळे यश गाठणे सोपे जाते अशी प्रतिक्रिया जाफरखानची आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात खेळ, व्यायाम हे अत्यंत महत्वाचे असून यामुळे आपण निरोगी आणि सुदृढ राहू शकतो, यामुळे प्रत्येकाने नित्यनेमाने व्यायाम करावा, असा सल्लाही तो देतो.
शालेय जीवनापासून या खेळाची आवड असणाऱ्या जाफरखानला कुटुंबीयांनीही साथ मिळत आली आहे. शिक्षणासह खेळात देखील आपली कामगिरी दाखवत आजवर अनेक ठिकाणी झालेल्या स्पर्धेत यशाचा मानकरी ठरला आहे. जिल्हा, राज्य, आंतरराज्य, राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमधून सहभाग घेऊन यश मिळविणाऱ्या जाफरखान सारवार या क्रीडापटूने बेळगावच्या क्रीडा विभागासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.
आज अनेक क्रीडाप्रकार हे बहुतांशी नागरिकांना परिचयाचे नाहीत. मात्र हे खेळ आपल्या दैनंदिन आयुष्यात, सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी मदतपूर्ण असे ठरतात. केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातूनच नाही तर आपल्या आयुष्यात व्यायामामुळे होणारे फायदे लक्षात घेऊन रोजच्या धावपळीच्या शेड्युलमधून थोडासातरी वेळ आपल्या शरीरासाठी दिल्यास जीवन जगताना कोणत्याही आरोग्याच्या तक्रारी उद्भवत नाहीत, हे सिद्ध आहे.
जाफरखान सारख्या तरुणांनी हा संदेश सर्वदूर पोहोचविण्याचा विडा तर उचललाच आहे मात्र केवळ खेळ नाही तर या खेळात आपली उत्तम कामगिरी दाखवत आपल्यासह बेळगावचेही नाव उंचावले आहे. जाफरखान सारवार याच्या पुढील आयुष्यासाठी टीम बेळगाव लाइव्हच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
*राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने….!*