आगामी श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोकमान्य टिळक सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्यावतीने आयोजित शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आज बुधवारी आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
शहरातील संयुक्त महाराष्ट्र चौक येथील श्री समादेवी मंदिर सभागृहात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त डाॅ. एम. बी. बोरलिंगय्या, महापालिका आयुक्त डाॅ. रुद्रेश घाळी यांच्यासह हेस्कॉम, पाणीपुरवठा मंडळ एल अँड टी, अग्निशामक दल आदी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत गणेशोत्सव मंडळांच्या गरजा व अपेक्षा याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच उपस्थित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून विविध समस्या मांडण्यात येऊन त्या सोडवण्याची मागणी करण्यात आली.
प्रामुख्याने विविध विभागांच्या अनुमती पत्रांसाठी सिंगल विंडो अर्थात एक खिडकी सुविधा व्यवस्थित उपलब्ध करून देण्यात यावी, श्री गणेशोत्सवाच्या 11 दिवसांच्या कालावधीत शहरात आरओ प्लांटच्या माध्यमातून मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देण्यात यावी, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, पथदीप बसविणे, संवेदनशील संशयास्पद ठिकाणी ज्यादा पोलिसांची नियुक्ती, सीसीटीव्ही कॅमेरा, मिरवणूक मार्ग रस्त्याची दुरुस्ती, विद्युत खांब बसविणे, स्वच्छ भारत व स्मार्ट सिटी अंतर्गत डस्टबिनचा वापर, हेस्कॉमच्यावतीने मंडळांना मीटरच्या डिपॉझिटमध्ये सूट, श्री गणेश प्रतिष्ठापना विसर्जन संदर्भात हेस्कॉमच्यावतीने लाईन मॅन नियुक्ती, पार्किंग व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था, 24×7 दुकाने खुली ठेवण्यास परवानगी, ध्वनिक्षेपकाचा वापर आदींबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच या सर्व बाबींची पूर्तता करण्याची मागणी यावेळी आमदारांसह महामंडळ आणि सर्व गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाकडे केली.
बैठकीस हेस्कॉमचे अधिकारी अम्मन्नावर, महापालिकेच्या अधीक्षक अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर, एल अँड टी कंपनीचे अधिकारी हार्दिक देसाई, पाणीपुरवठा मंडळ, कॅन्टोन्मेंट बोर्ड, अग्निशामक दल आदी विविध विभागांचे अधिकारी तसेच लोकमान्य टिळक सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, पदाधिकारी राजू खटावकर, अर्जुन रजपूत, रवी कलघटगी, नितीन जाधव, हेमंत हावळ, शरद पाटील, सौरभ सावंत आदींसह शहरातील विविध गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.