आचार्य अत्रे यांनी साहित्य, रंगभूमी, चित्रपट, शिक्षण, पत्रकारिता, राजकारण अशा विविध क्षेत्रात अफाट कार्य केले आहे. पण महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी त्यांनी केलेल्या कार्य अतिशय मोलाचे आहे. महाराष्ट्राचा इतिहास त्यांच्या या कार्याची नोंद घेतल्याशिवाय पूर्णच होणार नाही, असे उद्गार जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी काढले.
पत्रकार संघातर्फे आचार्य अत्रे जयंती यांची 124 वी जयंती शनिवारी (13 ऑगस्ट) रोजी साजरी करण्यात आली. यावेळी शहापूरकर बोलत होते. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष विलास अध्यापक होते.
प्रारंभी आचार्य अत्रे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अध्यापक यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
आचार्य अत्रे यांच्या साहित्य, रंगभूमी, चित्रपट, राजकारण आदी क्षेत्रातील कार्याचा आढावा घेऊन कृष्णा शहापूरकर आपल्या भाषणात म्हणाले की, त्यांचे प्रत्येक क्षेत्रातील कार्य उज्वल होते. दुसरा क्रमांक त्यांना माहित नव्हता. किंबहुना त्यांच्या शब्दकोशात दुसरा क्रमांक हा शब्दच नव्हता.
संयुक्त महाराष्ट्र समितीच्या अभूतपूर्व लढ्यानंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यामध्ये प्रामुख्याने कॉम्रेड श्री. अ. डांगे, एस. एम. जोशी व आचार्य अत्रे यांचे योगदान मोठे आहे. अत्रे यांनी वक्तृत्व व लेखणीद्वारे संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधकांवर कठोर प्रहार केले. त्यातून विनोबा भावे यांच्यासारखे सत्पुरुषही सुटले नाहीत. पण अत्रे जेवढे कठोर होते तेवढेच ते मनाने हळवे होते. तुकडोजी महाराजांचे निधन झाल्यानंतर त्यांची भजने म्हणत रडणारे अत्रेच होते.
आपल्या मराठा दैनिकातून त्यांनी बुवाबाजीवर सडकून टीका केली. तसेच भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणेही उघडकीस आणली. मराठा दैनिकाचा एक धबधबा होता. आजच्या विशिष्ट परिस्थितीत अत्रे असावयास हवे होते. ते राहिले असते तर सरकारला धारेवर धरले असते.
बेळगाव, खानापूर, निपाणीचा सीमाभाग बाहेरच राहिल्याने महाराष्ट्र राज्य अपुरे होते. म्हणून सीमाप्रश्न सुटावा यासाठी त्यांनी लढा उभा केला. सीमाप्रश्नासाठी आमदारकीचा राजीनामा देणारे ते पहिले होते. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल सीमावासीय मराठी जनता त्यांची कायम कृतज्ञ राहील.
कार्यवाह शेखर पाटील यांनी प्रास्तावित केले व महाराष्ट्र पत्रकार परिषदेचे प्रतिनिधी सुहास हुद्दार यांनी आभार मानले.
पत्रकार भावनात झालेल्या या कार्यक्रमास निवृत्त प्राध्यापक दत्ता नाडगौडा, कवयित्री रोशनी हुंद्रे, प्रकाश बेळगोजी, दीपक पावशे, माणिक होनगेकर, विकास कलघटगी, शिवराज पाटील, सई पाटील, चंद्रकांत कदम, मधू पाटील, कृष्णा कांबळे, दीपक सुतार आदी उपस्थित होते.