मराठा युवक संघातर्फे आबा स्पोर्ट्सच्या सहकार्याने येत्या रविवार दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी 17 व्या निमंत्रितांच्या भव्य आंतर शालेय व आंतर महाविद्यालयीन जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर यांच्या अध्यक्षतेखाली काल सोमवारी झालेल्या संघाच्या बैठकीमध्ये उपरोक्त निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत जलतरण स्पर्धा आयोजनाबाबत चर्चा करण्यात आली. सदर चर्चेअंती येत्या 21 ऑगस्ट रोजी आबा स्पोर्ट्सच्या सहकार्याने आंतर शालेय व आंतर महाविद्यालयीन जलतरण स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्याचप्रमाणे स्पर्धेसाठी येणाऱ्या खर्चाला देखील मंजुरी देण्यात आली. याप्रसंगी उपाध्यक्ष मारुती देवगेकर, कार्याध्यक्ष रघुनाथ बांडगी, सेक्रेटरी चंद्रकांत गुंडकल, नेताजी जाधव, विश्वास पवार, दिनकर घोरपडे, शेखर हंडे, विकास कलघटगी, नारायण किटवाडकर, सुहास किल्लेकर, शिवाजी हंगीरकर,श्रीकांत देसाई आदी उपस्थित होते. किल्लेकर यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.
मराठा युवक संघाची आंतर शालेय व आंतर महाविद्यालयीन जलतरण स्पर्धा गोवावेस येथील महापालिका जलतरण तलावात आयोजित केली जाणार आहे. सदर स्पर्धा मुलं-मुली अशा दोन विभागांसह विविध गटात घेतली जाईल. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी
विद्यार्थिनींनी आपली नावे रविवार दि. 14 ऑगस्ट 2022 पर्यंत गोवावेस मनपा जलतरण तलाव कार्यालयाच्या ठिकाणी नोंदवावीत, असे आवाहन सेक्रेटरी चंद्रकांत गुंडकल यांनी केले आहे. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी विश्वास पवार (मो. क्र. 9341108666, 74115 12304) अथवा अमित जाधव यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.