गेल्या कांही दिवसापासून बेळगाव शहरात विशेष करून मिलिटरी प्रदेश आणि गोल्फ कोर्स मैदान परिसरात वावरणाऱ्या बिबट्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यात भर म्हणजे कमी अनुभवासह वन्य प्राण्याला पकडण्यासाठीची अतिशय निकृष्ट पद्धत त्यामुळे 22 दिवस उलटून गेले तरी प्रशासनाला त्या बिबट्याला जेरबंद करण्यात अपयश आले आहे.
अलीकडच्या काळात मनुष्य आणि वन्य प्राण्यांमधील संघर्षांच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली असून संबंधित प्राण्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होण्याबरोबरच मनुष्यालाही धोका निर्माण झाला आहे. मानवी वसाहत जंगला नजीक सरकू लागल्यामुळे निवासाच्या जागा गमावणारे बिबटे नागरी वसाहतीकडे फिरकू लागले आहेत. परिणामी याचे पर्यवसान बिबट्याकडून पशुधनाचा आणि कांही वेळा मनुष्याचा बळी जाण्यामध्ये होत आहे. अशा घटनांमुळे साहजिकच ही मोठी मांजर नरभक्षक (मॅन इटर्स) बनतात.
बेळगावात ठाण मांडून असलेल्या चलाख बिबट्यापासून अद्यापपर्यंत तरी मनुष्य अथवा पशुधनाला धोका निर्माण झाला नाही. तथापि या मोठ्या जंगली मांजराला जिवंत पकडण्यात येणाऱ्या अपयशामुळे पोलीस आणि वनखात्यावर प्रचंड दडपण आले आहे. याचीच परिणीती बिबट्याला पकडण्याची प्रक्रिया बदलून त्याला ठार मारण्यामध्ये होऊ शकते. त्यामुळे फक्त नागरी वसाहतीमध्ये भटकत असल्याबद्दल बिबट्याला ठार मारता येते का? आणि बिबट्याच्या बाबतीत कायदा काय सांगतो? हे जाणून घेणे गरजेचे आहे.
वन्यजीव कायद्यात वाघ आणि बिबट्यांना सर्वोच्च संरक्षण देण्यात आले आहे. वाघ त्याचप्रमाणे बिबटे हे वन्यजीव संरक्षण कायदा 1972 च्या अनुसूची अंतर्गत वर्गीकृत असून त्यांच्या शिकारीच्या विरोधात कायद्याच्या कलम 9 (1) अंतर्गत त्यांना सर्वोच्च वैधानिक संरक्षण बहाल करण्यात आले आहे. एखाद्या बिबट्यापासून मनुष्याच्या जीवाला धोका असेल अथवा तो बिबटा अपंग किंवा असाध्य रोगाने ग्रस्त असेल तर त्याला प्रशासनाच्या रीतसर परवानगीने ठार मारता येते. मनुष्य आणि प्राणी यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) जारी केलेल्या मार्गदर्शक सूचीचा हा एक भाग आहे. मनुष्य प्राण्यासाठी बिबट्या जीवघेणा ठरत असेल तर त्याची या जगातून गच्छंती करता येऊ शकते. मात्र फक्त मानवी वसाहतीमध्ये भटकला म्हणून बिबट्याला ठार मारता येत नाही. बिबट्या जर मॅन इटर म्हणजे ‘मनुष्यभक्षक’ बनला असेल तर त्याला वन्यजीव संरक्षण कायदा 1972 च्या कलम 11 मधील तरतुदीनुसार ठार मारता येते. मात्र मार्गदर्शक सूचीनुसार फक्त राज्याच्या मुख्य वन्यजीव वार्डनना (चीफ वाइल्ड लाइफ वॉर्डन) प्रशासनाला संबंधित बिबट्याला ठार मारण्याचा आदेश देण्याचा अधिकार आहे. सर्व शक्यता लक्षात घेऊन तसेच बिबट्या स्थलांतरित होऊ शकत नाही किंवा त्याला पकडणे अशक्य होऊन तेथे पर्यवसान मनुष्याच्या जीवित हानी मध्ये वाढ होण्यात होऊ लागले तरच मुख्य वन्यजीव वार्डनकडून त्या बिबट्याला ठार मारण्याचा आदेश जारी केला जातो. बिबट्याची शिकार करण्यापूर्वी कारणासहित त्याला ठार मारण्याची वैधानिक लेखी परवानगी घ्यावी लागते.
एनटीसीएनुसार वाघ बिबट्यासारखी मोठी मांजर मनुष्यभक्षक बनण्याची अनेक कारणे आहेत. वयोवृद्धता, गंभीर जखमी झाल्यामुळे कार्यक्षम बनने किंवा पंजाची नख गमावणे ही त्यापैकी काही प्रमुख कारणे आहेत. अन्नाच्या शोधार्थ बिबटे अनेकदा मानव वसाहतीत भटकत असतात बिबट्या हा सर्वाधिक जुळवून घेणारा शिकारी प्राणी आहे. जंगल नष्ट झाले की ते शेत जमिनीमध्ये येऊन राहतात. त्याचप्रमाणे वन्य सावध मिळेनासे झाले की ते पशुधनावर जगतात. मनुष्याच्या नजरेपासून लपण्यात बिबटे अतिशय चपळ असतात. त्यामुळे उपलब्ध भरपूर पशुधन आणि मोकाट कुत्र्यांकडे दुर्लक्ष करून मनुष्याला ठार मारण्याद्वारे ‘मॅन इटर’ बनण्याची बिबट्याला कांहीच गरज नसते.
आपल्या एका ऐतिहासिक निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने प्राण्यांना सन्मान आणि प्रतिष्ठा असते त्यांना त्यांच्या अधिकार आणि गोपनीयतेपासून स्वैरपणे वंचित ठेवता येत नाही. आपण त्यांचा आदर करून बेकादेशीर हल्ल्यांपासून त्यांचे संरक्षण केले पाहिजे असे निरीक्षण नोंदविले आहे, हे देखील लक्षात घेतले पाहिजे.
आर्टिकल सौजन्य :वकील-किरण कुलकर्णी -हे प्राणी प्रेमी आहेत त्यांनी अनिमल वेल्फेअर बोर्ड इंडियाचे वकील म्हणून काम पाहिलेला आहे