उद्या दाखल होणाऱ्या गणरायाच्या स्वागतासाठी अवघे शहर सज्ज झाले असून सर्वत्र आनंद व उत्साहाचे वातावरण दिसण्याबरोबरच बाजारपेठ गर्दीने फुलून गेलेली दिसत आहे. पावसाळी वातावरण असताना देखील बाप्पाच्या स्वागतासाठी शोभिवंत वस्तू, मखर, पडदे, कपडे, फळे, फुले, पूजेचे साहित्य खरेदीसाठी आज मंगळवारी सकाळपासून बाजारात गर्दी होऊ लागली आहे.
कोरोनाच्या संकटानंतर श्री गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी भक्तांबरोबर बाजारपेठ ही विविध साहित्याने सजली आहे. गणेशोत्सव निमित्त सध्या बाजारपेठ विविध साहित्य आणि भरली असून खरेदीलाही उधाण आल्याचे दिसत आहे. विशेषत: बाजारात पूजेचे साहित्य, सजावटीचे साहित्य, विद्युत रोषणाईचे साहित्य याबरोबरच कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. गर्दीमुळे मुख्यमार्गांवर वाहतुकीची होणारी प्रचंड कोंडी लक्षात घेऊन शहरातील ठराविक रस्ते बॅरिकेड्स लावून पोलिसांनी बंद केले आहेत.
सजावट आणि हळद, कुंकू, गुलाल, दुर्वा, हार वगैरे पूजेच्या साहित्याबरोबरच केळी, नारळ, सफरचंद, चिकू, डाळिंब, पेरू, मोसंबी वगैरे पाच नग असलेल्या फळांना मागणी वाढली आहे. त्यामुळे फळ विक्रेते दुकानदार तसेच रस्त्यावरील फळ विक्रेत्यांकडे खरेदीसाठी गर्दी होत आहे. आज विशेष करून हरतालिका पूजा साहित्य खरेदीसाठी महिलावर्गाची बाजारात गर्दी दिसत होती.
त्याचप्रमाणे श्रीफळ अर्थात नारळाची विक्री तेजीत आहे. शहरातील गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, कलमठ रोड, काकतीवेस, शनी मंदिर, कपिलेश्वर रोड, शहापूरातील खडेबाजार, नाथ पै चौक, खासबाग सर्कल, वडगाव बाजार गल्ली, आरपीडी रोड आदी परिसरातील दुकाने गणेशोत्सवासाठी साहित्यांनी सजली असून तेथे मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. उपनगरांमध्ये देखील सजावटीचे व पूजेचे साहित्य खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी होताना दिसत आहे. कोरोनाच्या कालावधीत सणांवर मर्यादा आल्या होत्या. त्यामुळे उत्सव मर्यादित स्वरूपात करण्यात आले होते. मात्र यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्यामुळे खरेदीलाही उधाण आल्याचे दिसत आहे.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत होणारी गर्दी टाळण्यासाठी खरेदीस येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने बाजारपेठे बाहेरच उभी करावीत, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कार व इतर वाहनांमुळे गर्दीत भर पडत असून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उत्सव काळात मोठी वाहने बाजारपेठेत आणू नयेत असे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.