डॉक्टरांनी कोणत्याही उपचारांचा फायदा होणार नसल्याचे सांगितल्यामुळे हताश आई-वडिलांनी आपल्या मुलाचा जीव वाचविण्यासाठी देवाच्या भरोशावर त्याला नंदगड टेकडीवरील मिरॅक्युलस क्रॉसच्या पायाशी ठेवल्याची घटना दीड महिन्यापूर्वी घडली होती. मात्र सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे अधिक उपचारांती आता ‘त्या’ बालकाला जीवदान मिळाले असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
फेसबुक फ्रेंड्स सर्कल आणि श्रीराम सेना हिंदुस्तान यांच्या पुढाकाराने अंबर्डा, जोयडा येथील शैलेश कृष्णा सूत्रावी या 8 वर्षाच्या रुग्ण बालकाला गेल्या 21 जून 2022 रोजी नंदगड येथून आणून बेळगावच्या यश हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉ. एस. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
शैलेश याच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च आणि अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) बिल डाॅ. एस. के. पाटील यांनी पूर्णपणे माफ केले आहे हे विशेष होय.
शैलेशच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून ऑक्सीजन विना तो नैसर्गिकरित्या श्वासोच्छ्वास करू लागला आहे. त्याचप्रमाणे अन्नही ग्रहण करू लागला आहे. शैलेश याची घरची परिस्थिती बेताची असून त्याचे वडील कृष्णा हे रोजंदारी कर्मचारी आहेत.
मरणासन्न अवस्थेतील शैलेश सूत्रावी याचा जीव वाचविण्यास सहकार्य केल्याबद्दल फेसबुक फ्रेंड्स सर्कल आणि श्रीराम सेना हिंदुस्तानने कृष्णासाठी प्रार्थना करणाऱ्या बेळगाववासियांसह जिल्हाधिकारी नितेश पाटील, डीसीपी रवींद्र गडादी आणि संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचारी त्याचप्रमाणे खानापूर तालुका आरोग्य अधिकारी यांचे आभार मानले आहेत.