साम, दाम, दंड, भेद या नीतीचा अवलंब करत बिबट्याच्या शोधासाठी युद्धपातळीवर रात्रंदिवस कार्य सुरु आहे. वनविभाग, पोलीस विभाग आणि प्रशासन यासह अनेकांची तारांबळ उडत आहे. विविध योजना आखून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सुरु असलेल्या धावपळीत हत्तीही सामील झाले. मात्र दिवसभर वणवण भटकणाऱ्या हत्तींच्या अन्नासाठी मात्र दोन्ही हत्तींना वणवण भटकावे लागण्याची वेळ आली आहे.
अन्नाच्या शोधात निघालेल्या हत्तीने उसाच्या मळ्यात जाऊन ऊस खाल्ला खरा. मात्र यानंतर ऊस चोरीला गेल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. आधीच कायदा, सुव्यवस्था आणि शांतता सांभाळण्यात व्यस्त असलेल्या प्रशासनाला बिबट्यामुळे नाकीनऊ आले आहेत आणि अशातच ऊस चोरीला गेल्याची तक्रार ऊस मळ्याच्या शेतकऱ्याने केली आहे.
आजूबाजूचा ऊस सोडून केवळ मधोमध असलेला ऊस कुणी गायब केला? या विवंचनेत असणाऱ्या शेतकऱ्याला हत्तीने केलेला प्रकार लक्षात आला. ‘बेळगाव लाईव्ह’च्या माध्यमातून हत्तींच्या अन्नाच्या सोयीबद्दल सकाळीच एक व्हिडीओ प्रसारित झाला होता. यामुळे हि बाब शेतकऱ्याच्या निदर्शनात आली आहे. यानंतर वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याचेहि मान्य केले आहे.
बेळगाव गोल्फ मैदान परिसरात वावरणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी शिमोगा येथून मंगळवारी रात्री अर्जुन आणि आले हे दोन हत्ती शहरात दाखल झाले आहेत. सदर हत्ती ऊस खात असतानाचे ऑडिओ -व्हिडिओ प्रसिद्ध झाले होते. सदर वृत्त मुतगे येथील सामाजिक कार्यकर्ते नारायण कणबरकर यांनी पहिले. याचवेळी त्यांचे बंधू राजेंद्र यांनी ऊस चोरीचे वृत्त सांगितले आणि नारायण कणबरकर यांनी याबाबत राजेंद्र यांना माहिती दिली. सदर शेतकऱ्याने वनाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि उसाच्या चोरीची तक्रार त्यांच्याकडे केली. तेंव्हा त्या अधिकाऱ्यांनी आपली चूक मान्य करून जमिनीचा उतारा आणि संबंधित कागदपत्रे तातडीने सादर करून नुकसान भरपाई घेऊन जाण्यास सांगितले आहे.
शेतकऱ्यांची परवानगी न घेता बिनदिक्कतपणे या पद्धतीने उसाची चोरी करण्याच्या या प्रकाराबद्दल संताप व्यक्त होत आहे. ऊस हे हत्तींचे सर्वात आवडते खाद्य आहे. तेंव्हा उपरोक्त चोरीच्या गैरप्रकाराला तात्काळ आळा न घातल्यास हत्तींचे वास्तव्य जोपर्यंत बेळगावात आहे तोपर्यंत अन्य शेतकऱ्यांच्या ऊस पिकालाही चोरीचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी बिबट्याच्या शोध मोहिमेवर लक्ष ठेवून असलेल्या आमदार ॲड. अनिल बेनके यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी. तसेच राजेंद्र कणबरकर यांना योग्य नुकसान भरपाई देण्याबरोबरच हत्तींच्या पोटापाण्यासाठी अन्य शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे
मुतगा बेळगाव येथील राजू कणबरकर या शेतकऱ्यांने हत्तीसाठी शेतातील ऊस तोडल्याचा आरोप केला त्या शेतीचा व्हीडिओ pic.twitter.com/ncHHgUmWoe
— Belgaumlive (@belgaumlive) August 24, 2022