सिव्हिल हॉस्पिटल अर्थात जिल्हा रुग्णालयासह प्रमुख रुग्णालयांमध्ये पुढील महिन्यापासून रुग्णांची ऑनलाईन नोंदणी व पैसे भरण्याची डिजिटल प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे ही प्रणाली कालांतराने तालुक्यातील रुग्णालयांपर्यंत पोहोचविले जाईल.
वैद्यकीय उपचार प्रणालीला अधिक दर्जेदार आणि तत्पर करून त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी कांही महिन्यांपासून बेळगाव सिव्हिल हॉस्पिटल आणि राज्यामधील अन्य प्रमुख सरकारी रुग्णालयातील रुग्णांचा तपशील संकलित करण्याचे काम हाती घेण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव अंमलात आणताना पुढील महिन्यापासून रुग्णांचा तपशील ऑनलाईन नोंदविण्यास सुरुवात केली जाणार आहे. वैद्यकीय उपचार घेणाऱ्या रुग्णांचा ऑनलाइन तपशील नोंदविणारे कर्नाटक देशातील पहिले राज्य आहे.
सदर ऑनलाईन नोंदणीमुळे वैद्यकीय उपचारास मदत मिळण्याबरोबरच उपचाराची माहिती उपलब्ध होणार आहे. संभाव्य आजार आणि खबरदारी घेण्यासही याचे सहाय्य होणार आहे. याखेरीज वेळेवर वैद्यकीय उपचार मिळण्यासही मदत होणार आहे. ही योजना लागू होण्याची प्रतीक्षा संपली असून पुढील महिन्यापासून कार्यवाही होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून उपलब्ध झाली आहे.