बेळगावात मुसळधार पावसामुळे बळ्ळारी नाल्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बळ्ळारी नाला परिसराला भेट देऊन पाहणी केली. तसेच, पाऊस थांबल्यानंतर पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून योग्य ती भरपाई देऊ, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
मुसळधार पावसामुळे बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नाला परिसरातील बहुतांशी शेतजमीन जलमय झाली असून शेतकऱ्यांनी उभी केलेली पिके पाण्याखाली आली आहेत. पिकाचे पूर्ण नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
एनडीआरएफच्या नियमानुसार सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ज्यांची घरी पडली त्यांना संध्याकाळी ६ वाजेपर्यंत १० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे. नुकसानग्रस्तांना फूड किट देखील पुरविण्यात आले असून आणखी काही त्रुटी असल्यास त्या सरकारच्या निदर्शनात नक्कीच आणून देण्यात येतील.
निश्चित आणि योग्य सर्वेक्षण करून प्रत्येकाला भरपाई दिली जाईल, पिकांच्या नुकसानीसंदर्भात पाऊस थांबल्यानंतर सर्वेक्षण करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली आहे.
याचप्रमाणे बळ्ळारी नाल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जिल्हा पालकमंत्री, पाटबंधारे विभाग, लघु पाटबंधारे विभाग यासह अन्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन डीपीआर तयार करणार असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.
आज पावसाने काहीशी विश्रांती घेतली असून कालच्या पावसात ज्या कुटुंबांची घरे उद्ध्वस्त झाली त्यांना आम्ही नुकसान भरपाई दिली असून काही लोकांच्या बँक खात्यांबद्दल माहिती न मिळाल्याने नुकसान भरपाई देण्यात आली नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बँक तपशील उपलब्ध झाल्यास तातडीने १० हजार रुपयांची भरपाई देण्यात येईल, पीक नुकसानीसंदर्भातील भरपाई पावसाच्या उघडिपीनंतर पुनःसर्वेक्षणानंतर शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत एसी रवींद्र करलिंगनावर, मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, तहसीलदार आर के कुलकर्णी आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.