अंमली पदार्थ हे समाजासाठी फौजदारी गुन्ह्यापेक्षा अधिक धोकादायक आहेत. त्यांचे परिणाम फक्त आर्थिकच नाही तर समाज स्वास्थ्यासाठी देखील घातक आहेत, असे विचार पोलीस आयुक्त एम. बी. बोरलिंगय्या यांनी व्यक्त केले.
पोलीस खात्यातर्फे शहरातील राजा लखमगौडा कायदा महाविद्यालयाच्या सहकार्याने ‘अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा -1985’ या विषयावर आयोजित पोलीस अधिकारी आणि अंमलबजावणी कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळेमध्ये पोलीस आयुक्त बोलत होते. अंमली पदार्थ बाळगणे, त्याचे सेवन हा एक प्रकारे फौजदारी गुन्हा असून ज्याची पोलीस आणि अंमलबजावणी कर्मचाऱ्यांना चिंता आहे. हा एक असा रोग आहे ज्याच्यामुळे समाजाच्या आरोग्याची हानी होऊ शकते. अंमली पदार्थ विरुद्धचा कायदा व्यवस्थित काटेकोरपणे अंमलात आणण्यासाठी पोलिसांनी जनतेच्या सहकार्याने कार्य केले पाहिजे, असे मत पोलीस आयुक्त बोरलिंगय्या यांनी व्यक्त केले.
मादक पदार्थांविरुद्धच्या लढ्यात शहरातील कायदा महाविद्यालय आणि नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. याचा अर्थ असा नाही की कोणतीही संशयास्पद बाब आढळली की फक्त पोलिसांकडे तक्रार करा, असे न करता नागरिकांनी समाजातील वाईट प्रवृत्तींविरोधात जनजागृती केली पाहिजे, असे पोलीस आयुक्त बोरलिंगय्या म्हणाले. निकृष्ट तपास आणि मादक पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत गुन्ह्यांकडे सहजतेने पाहण्याच्या दृष्टिकोनामुळे आरोपी दोषी ठरण्याचे प्रमाण कमी होत आहे. यावर्षी आम्ही अमली पदार्थ विरोधी कायदे अंतर्गत जवळपास 29 गुन्हे दाखल करून आरोपींना न्यायालयासमोर हजर केले मात्र त्यापैकी क्वचित एखाद दुसरा दोषी ठरला आहे. याला दुसरे कारण म्हणजे आमच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा होय. मादक पदार्थ आणि त्याच्याशी संबंधित अन्य गुन्ह्यांचा होणारा नकारात्मक परिणाम दीर्घकाळ टिकणारा असतो. त्यामुळे सदर गुन्हे इतर सर्वसामान्य गुन्ह्यांप्रमाणे न हाताळता वेगळ्या पद्धतीने हाताळले पाहिजेत. आरोपींची अटक आणि खटला यावर समान लक्ष केंद्रित केले गेले पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले.
अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या मुलांच्या पालकांना आवाहन करताना बोरलिंगय्या यांनी अधिकारी आणि समुपदेशकांच्या जोडीने कार्यरत राहून पालकांनी युवकांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवावे असे आवाहन केले. जेंव्हा कुटुंबातील एक सदस्य व्यसनाधीन होतो, तेंव्हा संपूर्ण कुटुंब आर्थिक आणि भावनिक दृष्ट्या त्रासात लोटले जाते असे पोलिस आयुक्त एम. बी. बोरलिंगय्या सांगितले.
आर एल लाॅ कॉलेजचे माजी प्राध्यापक जी. एम. वाघ यांनी अंमली पदार्थ विरोधी कायद्यासंबंधी माहिती देऊन आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. याप्रसंगी पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी, पी व्ही स्नेहा, कॉलेज गव्हर्नमेंट कौन्सिल चेअरमन एम. आर. कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य ए. एच. हवालदार यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी आणि पोलिस अधिकारी उपस्थित होते.