बेळगाव लाईव्ह/क्रीडादिनविशेष: हृदयाला बळकटी देणारा एरोबिक व्यायाम म्हणजे पोहणे! हातापायांच्या हालचालीने नैसर्गिक रीतीने पाण्यातून प्रवास करण्याची हि क्रिया अनेकविध प्रकाराने केली जाते. अत्यंत लोकप्रिय, व्यायामदायक, रंजक क्रीडाप्रकारात मोडणाऱ्या या व्यायामात ऑलिम्पिक मध्येही विशेष असे महत्व आहे. पाच प्रमुख खेळांपैकी एक असणाऱ्या या क्रीडाप्रकारात व्यावसायिक जलतरणपटूंची खूप प्रशंसा होते.
अनेक खेळाडू या क्रीडाप्रकाराकडे विशेष आकर्षित झालेले पाहायला मिळतात. बेळगावमधील स्वरूप सतीश धनुचे हा खेळाडू देखील त्यापैकीच एक. वय वर्षे अवघे १४ मात्र या वयातच या बाल जलतरणपटूने ११ हुन अधिक स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य मिळावीत आपला ठसा उमटविला आहे. वडिलांचे पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे वयाच्या १४ व्या वर्षी स्वरूप धनुचे या जलतरणपटूने यश गाठले आहे.
राजकोट येथील ३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, बेंगळुरू येथील ४७ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, ओडिशा येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, कर्नाटक ऑलिम्पिक यासह अनेक ठिकाणी झालेल्या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेत आपली कामगिरी स्वरूपाने दाखविली आहे. जिल्हा, राज्य, आंतरराज्य, राष्ट्रीय पातळीवर आपल्या कामगिरीची चमक दाखवत राजकोट, बंगळुरू, ओडिशा यासह ११ ठिकाणी स्वरूपने पारितोषिके जिंकली आहेत. सुवर्ण – रौपय – कांस्य पदकांचा मानकरी ठरलेला स्वरूप सध्या संत मीरा शाळेत नवव्या इयत्तेत शिकत आहे.
हल्लीचा काळ हा स्पर्धेचा आहे. अनेक पालक आपल्या मुलांना अभ्यासाच्या दृष्टिकोनातून बळजबरी करतात. मात्र काही अपवादात्मक पालक अभ्यासासह अशा क्रीडाप्रकारांसाठीही आपल्या मुलांना प्रोत्साहन देतात. शालेय शिक्षण जितके महत्वाचे आहे तितकेच महत्वाचे प्रशिक्षण अशा अनेकविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचविण्याचे काम क्वचित पालकांकडून केले जाते.
आणि याच विचारातून देशाला अनेक मान्यवर मंडळींचे योगदान लाभते आणि देशाचे नाव उंचावले जाते. बेळगावच्या क्रीडा क्षेत्रात जलतरण विभागात उत्साहाने आणि जिद्दीने पुढे वाटचाल करत उत्तम कामगिरी करणारा स्वरूप धनुचे ही यापैकीच एक. त्याच्या पुढील वाटचालीस टीम बेळगाव लाईव्ह च्या शुभेच्छा!
*राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने….!*