बेळगावमध्ये वारंवार दहा रुपयांच्या नाण्यांसंदर्भात असलेला संभ्रम जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दूर केला असून आता नागरिकांना तसेच व्यावसायिकांना दहा रुपयांची नाणी मुक्तपणे चलनात आणता येतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन सादर केले आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दहा रुपयांची नाणी चलनात आणली आहेत. मात्र हि नाणी अनेक ठिकाणी स्वीकारली जात नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. कर्नाटकातील बहुतांशी भागात दहा रुपयांची नाणी स्वीकारण्यात येत नव्हती. मात्र महाराष्ट्र राज्यात १० रुपयांची नाणी स्वीकारण्यात येत असल्याने अनेक नागरिक दहा रुपयांची नाणी घेऊन कोल्हापुरात हि नाणी बदलून नोटांच्या स्वरूपात आणायचे प्रकारही अनेकवेळा पुढे आले आहेत.
बेळगावमधील अनेक व्यावसायिक, व्यापारी दहा रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार देत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत होत्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २० नोव्हेंबर २०१६ रोजी या नाण्यासंदर्भात आणखी एक घोषणा करत हि नाणी चलनात असल्याचे घोषित केले.
बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज असोसिएशनने यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले असून दहा रुपयांची नाणी स्वीकारण्यात येत नसल्याने होत असलेल्या गैरसोयींबद्दलची बाब निदर्शनात आणून दिली. दहा रुपयांची नाणी स्वीकारण्यास व्यापाऱ्यांकडून होत असली टाळाटाळ यामुळे दैनंदिन व्यवहारावर होणारे परिणाम, सुट्या पैशांची कमतरता यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने शहर बस विभागात दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सदर नाण्यांचा वापर बससेवेत वापर करण्याचे सांगितले. याचप्रमाणे बँक आणि संबंधित विभागासह एक परिपत्रक देखील जाहीर करण्यात येणार असून सदर नाणी कायदेशीर रित्या चलनात असल्याचे नमूद करावे, अशी विनंतीही यावेळी करण्यात आली.
चेंबर ऑफ कॉमर्सने दिलेल्या निवेदनानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे जनता आणि व्यावसायिकांना पूर्वीप्रमाणेच दहा रुपयांची नाणी चलनात आणता येणार आहेत.