स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगाव शहर उजळून निघणार असे वाटत होते. मात्र महापालिकेच्या सर्व प्रभागांमधील एकूण 34,500 पथदिपांपैकी तब्बल सुमारे 20,000 पथदीप बंद असल्यामुळे प्रत्यक्षात बहुतांश रस्त्यांवर रात्री अंधाराचे साम्राज्य पहावयास मिळत आहे.
बेळगाव महापालिकेकडे गेल्या 28 दिवसात ‘पथदीप बंद आहेत कृपया त्वरित स्वरूप करा’ अशी मागणी करणारे 347 फोन कॉल्स आले आहेत. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करून शहरात मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्यातरी शहरवासीयांना संध्याकाळानंतर पथदिपांच्या उजेडा अभावी अंधारातून वाट शोधावी लागत आहे.
महापालिकेच्या 58 प्रभागामध्ये 34,500 पथदीप असून यापैकी सुमारे 20,000 पथदीप बंद अवस्थेत आहेत. पथदिपांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी 8 पॅकेजमध्ये तीन एजन्सीकडे आहे. यासाठी वार्षिक कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जातो. मात्र तरीही सध्या शहरवासीयांना सायंकाळनंतर रस्त्यावर अंधाराचा सामना करावा लागत आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी एक असलेल्या मध्यवर्तीय बस स्थानक, किल्ला तलाव, सर्किट हाऊस, सम्राट अशोक चौक, आरटीओ सर्कल, ऑटोनगर रस्ता, गांधीनगर येथील पथदीप मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. याबाबत जाब विचारल्यास या ठिकाणी नव्या पद्धतीचे पथदीप बसविण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याचे स्मार्ट सिटी आणि महापालिकेकडून सांगितले जात आहे.
मात्र प्रत्यक्षात त्या ठिकाणी कोणतेही काम सुरू नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. उपरोक्त रस्त्यांखेरीज जाधवनगर, हनुमाननगर, शिवाजीनगर, टिळकवाडी, अनगोळ आदी भागात बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरील पथदीप बंदच आहेत.