श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था विभागाचे राज्य अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) अलोक कुमार यांनी आज मंगळवारी सकाळी शहरातील संवेदनशील भागात स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा केला.
पुणे, मुंबईनंतर उत्तर कर्नाटकात बेळगाव येथे भव्य प्रमाणात प्रचंड उत्साहाने श्री गणेशोत्सव साजरा केला जातो. बेळगावच्या गणेशोत्सवाला एक वेगळेच महत्त्व असल्यामुळे बेळगाव भेटीवर आलेले राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी आज मंगळवारी सकाळी शहरातील संवेदनशील भागाचा पाहणी दौरा केला.
यावेळी त्यांच्या समवेत पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरिंगलिंय्या, पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी, पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, एसीपी एन व्ही बरमनी, एसीपी कट्टीमनी, सीपीआय मल्लिकार्जुन तुळशीगेरी आदी वरिष्ठ अधिकारी तसेच लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे सुनील जाधव उपस्थित होते.
गणेशोत्सव सुरळीत शांततेने पार पडावा या दृष्टिकोनातून पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी जालगार गल्ली, भडकल गल्ली, दरबार गल्ली आदी संवेदनशील भागात पायी पाहणी दौरा करून स्थानिक अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. मोठ्या पोलीस फौजफाट्यासह पोलीस महासंचालकांनी हाती घेतलेला हा पाहणी दौरा साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत होता.
सर्वप्रथम प्रारंभी पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी चव्हाट गल्ली येथे भेट दिली. त्या ठिकाणी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके आणि गल्लीतील मंडळांच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी गणेशोत्सव व श्री विसर्जन मिरवणुकी संदर्भात संवाद साधला. तसेच पोलीस प्रशासनाला सहकार्य करत नेमून दिलेल्या मार्गावरून विसर्जन मिरवणूक कोणतेही गालबोट न लावता शांततेत उत्साहाने पार पाडावी असे आवाहन केले. यावेळी आमदार बेनके पोलीस प्रशासनाकडून केली जाणारी गणेशोत्सवाची पूर्वतयारी आणि बंदोबस्त याबाबतीत कांही सूचना पोलीस महासंचालकांसमोर मांडल्या.
याप्रसंगी लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, सुनील जाधव,विनायक पवार आदी उपस्थित होते. चव्हाट गल्ली येथून पोलीस महासंचालकांनी जालगार गल्ली, खडक गल्ली, भडकल गल्ली, खंजर गल्ली, दरबार गल्ली, गणपत गल्ली या भागाचा पाहणी दौरा केला. खडक गल्ली येथे तेथील गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस महासंचालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सदर पाहणी दौऱ्याची सांगता गणपत गल्ली मार्गे नरगुंदकर भावे चौक येथे झाली.
कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे ए डी जी पी अलोक कुमार यांनी केला उत्तर बेळगावातील संवेदनशील भागात दौरा-आमदार बेनके यांच्याकडूनही जाणून घेतली माहिती |Belgaum Live| pic.twitter.com/AMwSrMdJTc
— Belgaumlive (@belgaumlive) August 30, 2022