गेल्या कांही दिवसात पावसाने दिलेली उघडीप आणि मोठ्या संख्येने येणारे भाविक यामुळे वडगाव ग्रामदेवता श्री मंगाई देवीच्या यात्रेत दोन दिवसात लाखो रुपयांची उलाढाल झाली असून सर्वच विक्रेत्यांना ‘अच्छे दिन’ आल्याचे पहावयास मिळत आहे.
वडगावची ग्रामदेवता श्री मंगाई देवीच्या यात्रेला गेल्या मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. सध्या मंदिर परिसरात दर्शनासाठी व ओटी भरण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे ही यात्रा न भरल्यामुळे आता ही यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी केली जात आहे.
त्यामुळे वडगाव परिसरात सध्या पै -पाहुणे आणि मित्रमंडळींची गर्दी वाढली आहे. मंगळवारी यात्रेच्या मुख्य दिवसापासून रात्री उशिरापर्यंत वडगाव परिसरातील सर्वात सर्व रस्ते गर्दीने फुलून गेलेले पहावयास मिळत आहेत.
यात्रा परिसरात पूजेच्या साहित्यासह विविध खाद्यपदार्थ, मनोरंजनाची साधने, विविध प्रकारचे कपडे, घरगुती साहित्य व इतर वस्तूंचे स्टॉल मांडण्यात आले आहेत. या सर्वच स्टॉल्सवर गर्दी होत आहे. कांही विक्रेत्यांनी आपल्या दुकानांसमोर मंडप घालून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
देवीच्या दर्शनाबरोबरच भाविकांनी खरेदीवर भर दिल्यामुळे गेल्या दोन दिवसात येथील विक्रेते व व्यापाऱ्यांचा चांगला व्यवसाय झाला असून लाखोंची उलाढाल झाल्याचे जाणकारांनी सांगितले. श्री मंगाई देवी यात्रा पाच ते सहा दिवस चालत असल्यामुळे येत्या एक-दोन दिवसात आणखी उलाढाल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, रात्रीच्या वेळी कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी रात्री 11 नंतर दुकाने बंद करण्याची सूचना व्यापारी वर्गाला केली आहे.