देशातील सर्वात उंच राष्ट्रीय ध्वजांपैकी एक असलेल्या बेळगावच्या कोटेकेरे (किल्ला) तलाव येथील राष्ट्रध्वज आणि त्याच्या स्तंभाच्या देखभालीसाठी 5 लाखाहून अधिक खर्चाची निविदा काढण्यात आली आहे.
शहरातील किल्ल्या नजिकच्या कोटेकेरी तलाव येथे 4 एप्रिल 2018 रोजी पहिल्यांदा 110 मीटर उंचीच्या ध्वजस्तंभावर 9600 चौरस फूट आकाराचा आणि 500 किलो वजनाचा तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. त्यानंतर अल्पावधीत ध्वज खराब झाल्याचे आढळून आल्याने तो खाली उतरवून 12 मार्च 2018 रोजी पुन्हा फडकविण्यात आला.
पुढे आकाराने लहान करून देखील फडकविण्यात येणारा हा राष्ट्रध्वज जोरदार वाऱ्यासमोर टिकाव धरत नव्हता. परिणामी हा स्मारकीय राष्ट्रध्वज स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि सरकारच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रसंगी फडकविला जात आहे. आता या स्मारकीय राष्ट्रध्वजाचा वापर आणि देखभालीसाठी तसेच त्यासंबंधीच्या उपकरणांसाठी जीएसटी वगळता 5 लाख 97 हजार 24 रुपये खर्चाची निविदा काढण्यात आली आहे.
निविदेमध्ये पुढील बाबी अंतर्भूत आहेत. सर्व तिन्ही बाजूला मजबूत रिनफोर्स्ड नायलॉनची पट्टी असलेल्या 100 टक्के पॉलिस्टरपासून बनविलेल्या 90 चौरस फूट रुंद आणि 60 फूट उंच ध्वजाची देखभाल. खराब झालेल्या ध्वजा जागी नव्या ध्वजाची व्यवस्था करणे. संबंधित अधिकाऱ्यांकडून आदेश मिळाल्यानंतर ध्वज अर्ध्यावर उतरवणे, ध्वजारोहण आणि ध्वज उतरवण्यासाठी माणसं नेमून आवश्यक इलेक्ट्रिकल देखभाल करणे.
ध्वजस्तंभाचे इलेक्ट्रिकल पॅनल, गेअर सिस्टीम एसडीजीजी 135/9, 7.5 अश्वशक्तीची थ्री फेज इंडक्शन मोटर, ध्वजस्तंभातील मेकॅनिकल सिस्टीम, 8 मी.मी. वायर रोप, एव्हिएशन इंडक्शन लॅम्प, ध्वज वर -खाली करण्यासाठीचा पुली, वंगण साहित्य, गरज पडल्यास बुलडॉग ग्रिपर, वायर ग्रिपर्स, स्नॅप हुक वगैरे उपकरणे उपलब्ध करून देणे. दोन्ही लाईट मास्टची देखभाल, बल्ब रिप्लेसमेंट आदी 12 गोष्टींसाठी प्रत्येकी 39000 रुपये.
ऑइलिंग ग्रीसिंग किरकोळ दुरुस्ती वगैरे मशीन देखभालीच्या कामासाठी 24000 रुपये. सणाच्या महत्त्वाच्या प्रसंगाच्या एक दिवस आधी ध्वजारोहणाच्या रंगीत तालमीसाठी कामगार शुल्क 52,511.76 रुपये. ध्वजारोहणा दिवशी ध्वज फडकविणे आणि उतरविण्यासाठीचे कामगार शुल्क 52,511.76 रुपये. एकंदर 108 दिवस ध्वज फडकवणे आणि उतरवण्यासाठीचे दर निविदेत नमूद करण्यात आले असल्यामुळे कोटेकेरी तलाव येथील उत्तुंग राष्ट्रध्वज वर्षातील 108 दिवस फडकवावा लागणार आहे.