शहापूर येथील आयुर्वेदिक महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघा वैद्यकीय विद्यार्थिनी विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. तथापि महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग आणि आनंदाच्या मित्रांनी दोन्ही आरोपी विद्यार्थिनी या निष्पाप असून वारे याच्या आत्महत्येशी त्यांचा काहींही संबंध नाही, असे म्हंटले आहे.
शहापूर येथील आयुर्वेदिक महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या पनवेल पश्चिम (नवी मुंबई) येथील आनंद हणमंत वारे (वय 21) या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना गेल्या शुक्रवारी उघडकीस आली होती. या प्रकरणाला शनिवारी कलाटणी मिळाली असून मैत्रिणींच्या त्रासामुळे त्याने आपले जीवन संपविल्याची फिर्याद दाखल करण्यात आल्यामुळे पोलिसांनी दोघा विद्यार्थिनी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आनंद वारे हा बीएएमएसच्या तिसऱ्या वर्षाच्या शिकत होता. सध्या जेड गल्ली शहापूर येथील एका भाड्याच्या घरात त्याचे वास्तव्य होते. पनवेल येथील त्याचे वडील व इतर कुटुंबीय गेल्या शुक्रवारी बेळगावात दाखल झाल्यानंतर दरवाजा फोडून घरात प्रवेश केला असता आनंदने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून एक चिठ्ठी ताब्यात घेतली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी आनंदने त्या चिठ्ठीत आपले आई-वडील मित्र व प्राध्यापकांची माफी मागितली आहे. त्याचप्रमाणे आपल्या आत्महत्येबद्दल कोणालाही जबाबदार धरू नये असेही नमूद केले आहे.
दरम्यान मयत आनंद याचे वडील हणमंत वारे यांनी मैत्रिणींच्या त्रासामुळे आपल्या मुलाने जीवन संपविण्याचे फिर्यादीत नमूद केल्यामुळे शनिवारी या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली. फिर्यादीनुसार पोलिसांकडून आनंद बरोबर शिक्षण घेणाऱ्या दोघा वैद्यकीय विद्यार्थिनींवर भादवी 306 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तथापि महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग आणि आनंदाच्या मित्रांनी दोन्ही आरोपी विद्यार्थिनी या निष्पाप असून वारे याच्या आत्महत्येशी त्यांचा काहीही संबंध नाही असे म्हंटले आहे.
या संदर्भात प्राध्यापक आणि आनंदच्या मित्रांनी त्याच्या वडिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच पोलिसांना संबंधित विद्यार्थिनींवर गुन्हा नोंदविल्यास त्यांची शैक्षणिक कारकीर्द धोक्यात येईल. तेंव्हा सबळ पुरावा मिळाल्याखेरीज त्यांच्यावर गुन्हा नोंदवू नये अशी विनंती केली आहे. शनिवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून आनंदाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगर व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.