कर्नाटक राज्यात मुसळधार पावसामुळे ठीकठिकाणी पूर आले असून घरे आणि पिकांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’ तर बेळगावसह तीन जिल्ह्यात ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांना अतिवृष्टीग्रस्त भागांना भेटी देऊन मदत कार्याची वैयक्तिक देखरेख करण्याची सूचना करण्यात आली आहे.
पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात राहून मदत करायची जबाबदारी स्वीकारावी. पालकमंत्र्यांना पाऊस कमी होईपर्यंत जिल्हे न सोडण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. काल शुक्रवारी राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरू होता.
या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने मंगळूर, कारवार, उडपी, चिक्कमंगळूर, शिमोगा, कोडगू व हासन जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. या जिल्ह्यात भूस्खलन आणि पुराचा धोका निर्माण झाला आहे.
सध्या राज्यातील 14 जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. उत्तर कर्नाटकातील बेळगाव गुलबर्गा आणि बिदर अशा तीन जिल्ह्यांना पुढील 72 तासांसाठी ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. राज्यात जुलैमध्ये 94 टक्के ज्यादा पाऊस झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.