बेळगावसह राज्यातील सर्वच उपनोंदणी कार्यालयातील सर्व्हर डाऊन झाले आहेत. बेळगाव येथील उपनोंदणी कार्यालयातील सर्व्हर तर मागील सात दिवसापासून डाऊन असून आणखी दोन दिवस ही समस्या भेडसावणार आहे. यामुळे सदर कार्यालयातील सर्वच व्यवहार थंडावल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे उपनोंदणी कार्यालयातील जमिनीशी संबंधित सर्व व्यवहारांवर याचा परिणाम जाणू लागला आहे. जमिनीशी संबंधित दाखले मिळणे अवघड झाले असून जमिनीची नोंदणी आणि इतर कामे हे ठप्प झाले आहेत. जमिनीसंबंधी व्यवहार लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठी लोकांची घाईगडबड सुरू असली तरी सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे सर्व व्यवहार ताटकळले आहेत.
बोजा आणि इतर प्रमाणपत्र मिळत नसल्याने गृह कर्ज, शेती कर्ज मिळण्यातही अडचणी येत आहेत. आपली कामे वेळेत पूर्ण करून घेण्यासाठी नागरिकांना रोज उपनोंदणी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. कोणत्याही क्षणी सर्वांची समस्या सुटेल या आशेने नागरिक पूर्ण दिवस कार्यालयाच्या ठिकाणी थांबून प्रतीक्षा करताना दिसत आहेत. मिळालेल्या
माहितीनुसार बेंगलोर येथील मुख्य सर्व्हर मध्येच समस्या निर्माण झाली असल्याने त्याचा परिणाम राज्यातील सर्व उपनोंदणी कार्यालयातील सर्व्हरवर झाला असून समस्या दूर करण्याचा प्रयत्न नोंदणी आणि मुद्रांक शुल्क खात्याकडून केला जात आहे.
तथापि सर्व्हर डाऊनची नेमकी तांत्रिक समस्या अभियंत्यांना अद्याप सापडलेली नाही. त्याचप्रमाणे उपनोंदणी कार्यालयात वापरले जाणारी सर्व्हर सिस्टीम जुनी झाली असल्यामुळे नव्या तंत्रज्ञानाची गरज आहे. नवे सॉफ्टवेअर विकसित केल्यास ही समस्या दूर होऊ शकते, असे अधिकाऱ्यांचे मत आहे.