भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी झटत असताना प्रवाशांकडून मात्र स्वतःहून स्वतःचा जीव धोक्यात घालण्याचे प्रकार घडत असतात. असाच प्रकार रविवारी मध्यरात्री बेळगाव रेल्वे स्थानकावर पहावयास मिळाला जेंव्हा असंख्य युवक धोकादायकरित्या रेल्वेमध्ये चढत होते.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पश्चिम घाटातील दूधसागरचा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. हा धबधबा पाहण्यासाठी बेळगाव परिसरातूनही मोठ्या संख्येने पर्यटक दूध सागरला जात आहेत.
या पर्यटकांनी वास्को -निजामुद्दीन रेल्वेने दूधसागरला जाण्यासाठी बेळगाव रेल्वे स्थानकावर रविवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास गर्दी केली होती. परंतु यावेळी प्लॅटफॉर्मवरून रेल्वेमध्ये चढण्याऐवजी विरुद्ध बाजूला असलेल्या रेल्वे मार्गावरून धावत असंख्य युवक धोकादायकरित्या रेल्वेच्या बोगीमध्ये चढत होते.
सदर युवक जमिनीपासून उंचावर असलेल्या बोगीमध्ये अत्यंत दाटीवाटीने रेल्वेमध्ये चढत असताना सुदैवाने रेल्वे सुरू झाली नाही अन्यथा एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. सदर प्रकार पाहून रेल्वे स्थानकावरील अन्य प्रवाशांमध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत होती.
अधिकृतपणे लोंढा जंक्शन कडून दुधसागर ला रेल्वे थांबत नाही मात्र घाट सेक्शन असल्याने ये जा करणारी रेल्वे दुधसागर रेल्वे स्थानकावर काही वेळेसाठी थांबत असते त्यावेळी पर्यटक तिथून ये जा करत असतात.तर दुसरीकडे रेल्वे ऐवजी ट्रॅक वरून चालत जाण्यासाठी बंदी आहे मात्र शेकडो पर्यटक रुळावरून देखील चालत जात असतात.एकूणच दुधसागरला जाण्यासाठी अधिकृतपणे बंदी असली पर्यटक मात्र गर्दी करत असतात.
बेळगाव रेल्वे स्थानकावरील देखील प्रकार दुधसागरला पर्यटक म्हणून जाणाऱ्या युवका मुळे घडला आहे.