वाहतुकीची कोंडी,नागरिकांची सुरू असलेली ये जा आणि मोठ्या प्रमाणात भरलेला बाजार प्रत्येक दुकानांमधून सुरू असणारी नागरिकांची अन्नधान्याची खरेदी असे चित्र प्रामुख्याने शनिवारच्या बाजारात पाहायला मिळते. मात्र शनिवारी बाजारपेठेत शुकशुकाट अनुभवायला मिळाला.कारण अन्नधान्य व डाळिंवर 5% वस्तू सेवा कर आकारण्याच्या केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ शनिवारी बाजारच्या दिवशी व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्याने शहरातील बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला.
बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या नेतृत्वाखाली रविवार पेठ आणि कांदा मार्केट येथील व्यापाऱ्यांनी अन्नधान्य व डाळिंवरील कर रद्द करावा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले होते. त्यानुसार व्यापारांनी बंदला उत्तम प्रतिसाद दर्शवत बंद यशस्वीपणे पार पाडला
केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तू, कडधान्य इतर धान्यावर वर पाच टक्के जनतेला जीएसटी लागू केला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसणार आहे.महागाईमुळे आधीच जनता मेटाकुटीला आली असताना या जीवनावश्यक वस्तूंवर कर लादल्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील होणार असून याकरिता हा कर रद्द करावा यासाठी रविवार पेठ कांदा मार्केट तसेच एपीएमसी मार्केट बंद ठेवून सदर बंद पाळला.
प्रामुख्याने बेळगाव मध्ये शनिवार हा बाजारचा दिवस मानला जातो. बेळगाव शहर,उपनगरे तसेच ग्रामीण भागाबरोबरच चंदगड कोकण या भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक शनिवारच्या बाजारपेठेत अन्नधान्याची खरेदी करतात. ग्रामीण भागातील छोटे मोठे व्यापारी देखील होलसेल दरात बेळगावमधून अन्नधान्यांची खरेदी करतात.
मात्र सरकारच्या विरोधात पुकारलेल्या बंदामुळे शनिवारचा बाजार शांत असल्याचे दिसून आले. बाजारपेठेत प्रामुख्याने भाजीविक्रेते तसेच फळविक्रेते साहित्यांची विक्री सुरू होती.मात्र अन्नधान्याची बाजारपेठ म्हणून ओळखले जाणारा रविवार पेठेचा बाजार बंद असल्याने एरव्ही असणारी बाजारपेठेतील वर्दळ या शनिवारी पाहायला मिळाली नाही.
सरकारने जीवनावश्यक वस्तूवर कर लागल्यामुळे याचा फटका प्रामुख्याने सर्वसामान्य छोट्या व्यापाऱ्यांना बसणार असून नागरिकांना देखील यामुळे महागाईचा सामना करावा लागणार आहे. जीवनावश्यक वस्तूंवरील कर रद्द करणे गरजेचे असून यासाठीच एक दिवस व्यापार बंद ठेवून या बंदला प्रतिसाद दर्शविला.