कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर इंडियन रेड क्रॉस सोसायटी बेळगाव शाखेतर्फे मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर, जेएल विंग आणि मिलिटरी हॉस्पिटल यांना एकूण 57 हजार इम्पोर्टेड पुनर्वापर करता येणारे फेसमास्क आज देणगी दाखल देण्यात आले.
भारतीय रेड क्रॉस सोसायटीच्या बेळगाव शाखेतील रेड क्रॉस राज्य व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. एस. बी. कुलकर्णी रेडक्रॉस ईसी सदस्य विकास कलघटगी व रेड क्रॉस राज्य आपत्ती निवारण समितीचे सदस्य एल. व्ही. श्रीनिवासन यांनी आज शनिवारी सकाळी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे जाऊन एमएलआयआरसी कमांडंट ब्रिगेडियर मुखर्जी यांची भेट घेतली.
या भेटीप्रसंगी रेड क्रॉसच्या या पदाधिकाऱ्यांनी मराठा लाईट इन्फंट्री व जेएल विंगसाठी 41000 तर मिलिटरी हॉस्पिटलसाठी 16000 इम्पोर्टेड पुनर्वापर फेसमास्क अनुक्रमे ब्रिगेडियर मुखर्जी आणि मिलिटरी हॉस्पिटलच्या कमांडिंग ऑफिसर कर्नल पद्मिनी यांच्याकडे देणगी दाखल सुपूर्द केले.
यावेळी बोलताना डॉ. एस. बी. कुलकर्णी यांनी नैसर्गिक आणि मनुष्यनिर्मित आपत्ती दरम्यान घ्यावयाची खबरदारी, मदतकार्य आणि प्रथमोपचार याचे महत्त्व विशद केले.
दर्जेदार पुनर्वापर फेसमास्क पुरवल्याबद्दल भारतीय रेड क्रॉस सोसायटीच्या बेळगाव शाखेचे ब्रिगेडियर मुखर्जी आणि कर्नल पद्मिनी यांनी यावेळी आभार माणून रेड क्रॉसच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अन्य लष्करी अधिकारी उपस्थित होते.