खानापूर (जि. बेळगाव) येथे घडलेल्या अपघातानंतर ‘ब्रॅनडेड’ घोषित केलेल्या एका 26 वर्षीय युवकाच्या अवयवांचे प्रत्यारोपण करण्यात आल्यामुळे 4 गरजू लोकांना जीवदान मिळाले आहे.
खानापूर येथील अपघातानंतर केएलई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका युवकाचा मेंदू मृत झाल्यामुळे डॉक्टरांनी त्याला ‘ब्रेनडेड’ घोषित केले. यावेळी सदर युवकाच्या कुटुंबीयांचे मन परिवर्तन करण्यात आल्यानंतर त्यांनी स्वखुशीने त्या युवकाचे अवयव दान केले.
कुटुंबीयांचे मन परिवर्तन करण्यासाठी आमटे (ता. खानापूर) गावातील प्रतिष्ठित नागरिक कसर्लेकर यांच्यासह केएलईचे अभिमन्यू डागा आणि सामाजिक कार्यकर्ते माजी महापौर विजय मोरे यांनी पुढाकार घेतला होता.
विशेष करून कसर्लेकर व डागा यांनी ब्रॅनडेड युवकाच्या मातापित्यांचे उत्तम प्रकारे समुपदेशन केले. सदर युवकाच्या अवयवांपैकी हृदयाचे केएलई हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या एका रुग्णांमध्ये प्रत्यारोपण करण्यात आले. त्याचप्रमाणे दोन्ही मूत्रपिंडे बेळगाव येथून धारवाडच्या एसडीएम हॉस्पिटलकडे प्रत्यारोपणासाठी धाडण्यात आली.
मूत्रपिंडाच्या वाहतुकीसाठी बेळगाव ते एसडीएम हॉस्पिटल धारवाडपर्यंत झिरो ट्रॅफिकसह ग्रीन कॉरिडोरची व्यवस्था करण्यात आली होती. अवयव दात्या युवकाचे यकृत लिव्हर प्रथम हुबळी येथे आणि तेथून विमानाने हवाई मार्गे बेंगलोर येथील बीजीएस हॉस्पिटलला पाठविण्यात आले. त्या ठिकाणी त्या यकृताचे हॉस्पिटलमधील गरजू रुग्णावर प्रत्यारोपण केले जाणार आहे.
अवयव दान प्रक्रियेनंतर त्या युवकाचा मृतदेह अंतिम संस्कारसाठी त्याच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला. गेल्या आठवड्यात एका महिलेचे मूत्रपिंड झिरो ट्रॅफिकच्या माध्यमातून धारवाड येथून बेळगावला आणण्यात आले होते. त्याचप्रमाणे हृदय प्रत्यारोपणासाठी धारवाड ते बेळगाव ग्रीन कॉरिडॉर निर्माण करण्यात आला होता.