गोडसे कॉलनी, जुना गुडसशेड रोड येथील ‘वन टच फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून कोरे गल्ली येथील गरजू वृत्तपत्र विक्रेते रमेश सरोदे यांना आर्थिक मदत देण्यात आली.
रमेश सरोदे यांची घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असून त्यांचा एकुलता एक मुलगा योगेश याला कॅन्सर असून त्याच्या उपचारासाठी दरमहा रू.8000 ते 10,000. इतका खर्च येतो. रमेश यांची पत्नी सुनीता या सुद्धा अंथरुणावर खिळून आहेत.
सोबत वयस्कर आई ,भाडोत्री घर अशी परिस्थिती असताना रमेश एकट्याने संसाराचा गाडा हाकत आहेत. रमेश सरोदे यांची एकंदर परिस्थिती “वन टच फाऊंडेशन”चे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल फोंडू पाटील यांना समजतात त्यांनी त्वरित श्रीनिवास पाटील यांच्या सहकार्याने आषाढी एकादशीच्या निमित्ताने कोरे गल्ली येथील सरोदे यांच्या घरी जाऊन त्यांना मुलाच्या उपचारासाठी रोख 8000 रुपयांची मदत केली. तसेच संस्थेचे सदस्य टि. डी. पाटील यांनी एक महिना पुरेल इतके जीवनावश्यक साहित्य देऊ केले.
सदर मदतीबद्दल सरोदे यांची पत्नी सुनीता यांनी डोळ्यातून अश्रु ढाळत हात जोडून आभार मानले. महिनाभरापूर्वी विठ्ठल पाटील यांनी जीवनावश्यक साहित्य देऊन सरोदे कुटुंबाला अधिक मदतीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांना काल आर्थिक मदत देऊ केली ही मदत सेवा श्रीनिवास पाटील यांच्याकडून मिळाली.
मदत देतेवेळी फाऊंडेशन सदस्य टि. डी. पाटील, ज्योतेश हुरुडे, नारायण कांगले, जयप्रकाश बेळगावकर , विठ्ठल पाटील आणि श्रीनिवास पाटील उपस्थित होते.
अजूनही कोणी सरोदे कुटुंबाला मदत करणार असतील तर त्यांनी त्यांच्या घरी समक्ष भेटून करावी किंवा वन टच फाऊंडेशनशी 8886460133 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन ज्योतेश हुरुडे यांनी केले आहे.