कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणातून 12 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला असल्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली असून त्या अनुषंगाने बेळगाव जिल्ह्यातील कृष्णा नदीचे पात्र परिसरात पूर परिस्थितीचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी सध्या प्रचंड प्रवाहित झाली असून कोणत्याही क्षणी ती धोक्याची पातळी ओलांडू शकते. कोंकण परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे पश्चिम घाटातून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात नदीपात्रात येण्यास सुरुवात झाली आहे.
पाण्याचा अतिरिक्त साठा होऊ लागल्यामुळे राधानगरी धरणातून 12000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. परिणामी पंचगंगा नदी पात्राची पातळी वाढली आहे. संततधार पाऊस सुरूच राहिल्यास आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत पंचगंगा धोक्याची पातळी ओलांडू शकते, असा तज्ज्ञांचा तर्क आहे.
पंचगंगा नदीला महापूर आल्यास त्याचे परिणाम कर्नाटकातील कृष्णा नदी परिसरातील लोकांना भोगावे लागणार आहेत. पंचगंगा नदी ही महाराष्ट्राच्या हद्दीतील नरसिंहवाडी येथे कृष्णा नदीला मिळते, या ठिकाणी कृष्णा व पंचगंगेचा संगम होतो. त्यामुळे महाराष्ट्रात विशेष करून कोकण परिसरात अतिवृष्टी झाली आणि जर पंचगंगेला महापूर आला तर कृष्णा नदी देखील धोक्याची पातळी ओलांडून वाहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुसळधार पाऊस सुरूच राहिल्यास आज रात्री किंवा उद्या सकाळी पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडू शकते. बेळगाव शहर परिसरात सध्या पाऊस सुरूच आहे, त्याचबरोबर पश्चिम घाट परिसरात मोडणाऱ्या खानापूर जांबोटी आदी परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे या भागातील नदी -नाले देखील सध्या तुडुंब भरून वाहत असून कोणत्याही क्षणी कोठेही धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
27 बंधारे पाण्याखाली
राधानगरी धरणातून 1200 क्युसेक विसर्ग
कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 84.33 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे व राशिवडे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, पेंडाखळे व बाजारभोगाव, कुंभी नदीवरील- मांडूकली, शेणवडे, कळे व वेतवडे, धामणी नदीवरील- सुळे व अंबार्डे, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, तुळशी नदीवरील- बीड व वेधगंगा नदीवरील कुरणी, बस्तवडे व चिखली असे 27 बंधारे पाण्याखाली आहेत.
आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 42.45 दलघमी, वारणा 353.03 दलघमी, दूधगंगा 219.65 दलघमी, कासारी 34.30 दलघमी, कडवी 26.10 दलघमी, कुंभी 35.01 दलघमी, पाटगाव 42.53 दलघमी, चिकोत्रा 19.76 दलघमी, चित्री 18.47 दलघमी, जंगमहट्टी 14.65 दलघमी, घटप्रभा 42.61 दलघमी, जांबरे 10.14 दलघमी, आंबेआहोळ 19.25, कोदे (ल.पा) 5.83 दलघमी असा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 30.4 फूट, सुर्वे 28.3 फूट, रुई 55.6 फूट, इचलकरंजी 53.6, तेरवाड 46 फूट, शिरोळ 35 फूट, नृसिंहवाडी 27 फूट, राजापूर 19.1 फूट तर नजीकच्या सांगली 5.9 फूट व अंकली 11 फूट अशी आहे.
गगनबावडा येथे काल 134.9 मिमी पाऊस
कोल्हापूर, दि. 6 (जिमाका): जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 134.9 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 9.42 वाजेपर्यंतच्या 24 तासात पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे –
हातकणंगले- 19.7 मिमी, शिरोळ – 14.2 मिमी, पन्हाळा- 49.8 मिमी, शाहूवाडी- 43.6 मिमी, राधानगरी- 61.9 मिमी, गगनबावडा-134.9 मिमी, करवीर- 41.8 मिमी, कागल- 39.9 मिमी, गडहिंग्लज- 33.5 मिमी, भुदरगड- 77.3 मिमी, आजरा- 51 मिमी, चंदगड- 53.3 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.