नियती फाउंडेशनचे अध्यक्षा व भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्या नेतृत्वाखालील समस्या निवारण केंद्राच्या प्रयत्नांमुळे सरकारी स्वस्त धान्य अर्थात रेशन सुविधेपासून वंचित असलेल्या खानापूर तालुक्यातील तब्बल 23 गावांना या महिन्यापासूनच रेशन पुरवठा सुरू होणार आहे.
शहरात आज बुधवारी प्रसार माध्यमांना डॉ. सोनाली सरनोबत यांनी स्वतः ही माहिती दिली. त्या म्हणाल्या, खानापूर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या समस्या निवारण केंद्रामध्ये जवळपास 23 गावांमधून रेशनची सुविधा उपलब्ध नसल्याचे तक्रार अर्ज आले होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे झाली तरी संबंधित गावांमध्ये सरकारी स्वस्त धान्य दुकानांची अर्थात रेशनची व्यवस्था नाही.
ही बाब गांभीर्याने घेऊन आम्ही त्या प्रत्येक गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आम्ही मोहिते, हणबरवाडा, दूधवाड, मिराशीवाडा, वाटरे, जुपताळे, पाटीये, गवळीवाडा, वरकड, मेंडील, पाली, देगाव, तळेवाडी, आमगाव, मुदवाळ, पिंपळे, गवळीवाडा, गारली, माचाळी, मांजरकाई, सातनाळी, करीकट्टी व झुंजवाड या गावांना भेटी देऊन स्पॉट इन्स्पेक्शन केले व तेथील परिस्थिती जाणून घेतली.
खानापूर तालुक्यातील रेशन पुरवठ्यासाठी सरनोबत यांचा प्रयत्न यशस्वी@drsonalisameer @UMESHKATTI3 @belgaumlive pic.twitter.com/eRKXviBo3X
— Belgaumlive (@belgaumlive) July 20, 2022
सर्वेक्षणानंतर सदर गावांमध्ये रेशन व्यवस्थेची गरज लक्षात घेऊन या ठिकाणी रेशन वितरणाची सोय व्हावी अशी विनंती आम्ही अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री उमेश कत्ती यांच्याकडे अर्जाद्वारे केली होती. त्याचप्रमाणे अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना अर्ज करून त्या 23 गावांमध्ये रेशन वितरणाची सोय करावी अशी मागणी केली होती.
मंत्री कत्ती यांच्यासह अधिकाऱ्यांनी आमची मागणी वजा विनंती मान्य केली असून संबंधित गावांमध्ये रेशन वितरणाची सोय केली जाईल, असे नोटिफिकेशन काढले आहे अशी माहिती देऊन त्यामुळे या महिन्यापासूनच त्या गावांमध्ये रेशन वितरणाला प्रारंभ होणार आहे, असे डॉ सोनाली सरनोबत यांनी स्पष्ट केले.