फक्त सुगरणीचा खोपाच सुंदर म्हणण्यापेक्षा चहुकडे नजर फिरवल्यास किटकसुध्दा आपली घरटी -खोपे सुबक आणि कल्पकतेने तयार करत असल्याचे पाहून कौतुक केल्याशिवाय रहावत नाही.
असेच एक लक्षवेधी घरटे सध्या येळ्ळूर रोड शेजारी पहावयास मिळत आहे. मुंग्या सदृश्य कीटकांनी हे आगळे घरटे तयार केले आहे.
बळ्ळारी नाल्याच्या पुरामुळे येळ्ळूर रोड शेजारील शेत जमीन नेहमी पाण्याखाली जात असते. या पुराच्या पाण्याचा धोका असलेल्या जमिनीवर राहणे सुरक्षित नसल्यामुळे मुंग्या सदृश्य कीटकांनी चक्क येथील एका झाडावर खोपा बांधून आपली वसाहत वसविली आहे.
शेतकरी नेते राजू मरवे यांनी रस्त्याशेजारी रानातील पाण्यामध्ये उतरून त्या खोपा अर्थात घरट्यापर्यंत जाऊन निरीक्षण केले असता. मुंग्या सदृश्य कीटक गवत, माती, झाडाचा चिकट द्रव, फुलांचे पराग कण आदींपासून आपले आगळे घरटे तयार करत असल्याचे निदर्शनास आले.
पुराच्या पाण्याचा धोका लक्षात घेऊन मुंग्यासारख्या अत्यंत छोट्या यत्कचीत कीटकांनी बांधलेले हा खोपा म्हणजे दूरदृष्टी, सुबकता, कल्पकता, समन्वय, एकजूट आणि अथक परिश्रम याचे प्रतीक आहे असे म्हंटल्यास वावगे ठरू नये.