डॉक्टरेट मिळविण्यासाठी अध्ययन, संशोधन आणि माझे परिश्रम आहेतच, परंतु या जोडीलाच माझ्या मित्रपरिवाराने केलेले सहकार्य अमूल्य आहे, असे मनोगत प्रा. डॉ. अरुण होसमठ यांनी व्यक्त केले.
गोंधळी गल्लीतील सा. ‘वीरवाणी’ कार्यालयात दि. 2 रोजी मित्रपरिवारातर्फे डॉ. होसमठ यांना वृत्तपत्र क्षेत्रात पीएचडी मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. सत्कारानंतर डॉ. होसमठ यांनी मनोगत व्यक्त केले.
ज्येष्ठ स्वयंसेवक महेश नरगुंदकर, रामनाथ नायक, विनायक ग्रामोपाध्ये यांच्या हस्ते डॉ. होसमठ यांचा शाल अर्पण करून फळांची करंडी व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
डॉ. होसमठ म्हणाले की, वृत्तपत्रातील लेखकांचा पत्रव्यवहार आदीबाबत संशोधन केले.
यासाठी भरपूर फिरावे लागले, मित्रांच्या घरी तसेच वीरवाणी कार्यालयात येऊन पीएचडीचे काम केले. यासाठी अनेकांचे उत्तम सहकार्य लाभले. त्या सर्वांचा ऋणी आहे. हा सत्कार हा मित्रपरिवाराचाच आहे.
यावेळी किशोर काकडे यांनी वैयक्तिक गीत सादर केले. सर्वश्री काकडे, सुनील आपटे, रामचंद्र एडके, रामनाथ नायक यांनी डॉ. होसमठ यांच्या सहवासातील अनेक आठवणींना उजाळा देत त्यांना भावी जीवनात उत्तुंग यशप्राप्तीसाठी शुभेच्छा दिल्या. रामनाथ नायक यांनी प्रास्ताविक केल्यानंतर आभार मानले.