पावसाळ्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्या पुढाकाराने खबरदारीचा उपाय म्हणून पाटील मळा येथील नाल्याच्या कोसळलेल्या भिंतीच्या ठिकाणी वाळूच्या पोत्यांची तात्पुरती भिंत वजा बंधारा बांधण्यात आल्यामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.
पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी झाल्यास शहरातील नाल्यांमुळे बऱ्याच ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होत असते. यंदा ही परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके बेनके प्रयत्नशील आहेत. त्यासाठी नाल्यांची साफसफाई करण्याबरोबरच कोनवाळ गल्ली येथील नाल्याचे बांधकाम हाती घेण्यात आले असले तरी अद्याप ते पाटील मळ्यापर्यंत पूर्ण करण्यात आलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात या परिसराला नाल्यातील पाण्याचा धोका आहे.
याखेरीज गेल्या दोन वर्षांपूर्वी पाटील मळा येथील नाल्याची भिंत कोसळली आहे. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास नाल्यातील पाण्यामुळे पाटील मळा परिसरात धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन या भागाच्या नगरसेविका वैशाली भातकांडे आणि त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ भातकांडे यांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता. यासंदर्भात त्यांना आमदार ॲड. अनिल बेनके यांचा पाठिंबा व मार्गदर्शन लाभले.
आमदारांच्या सहकार्याने नगरसेविका भातकांडे यांनी नुकतीच पाटील मळा येथील भिंत कोसळलेल्या नाल्याच्या काठावर वाळूच्या पोत्यांची बंधाऱ्या स्वरूपात तात्पुरती भिंत बांधून घेतली आहे.
यामुळे नाल्यातील पाणी पात्राबाहेर पडण्यास अटकावा होणार आहे. या पद्धतीने नाल्यातील पाण्यापासून संरक्षण मिळाल्यामुळे परिसरातील नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.