तो जीव कोणताही असो,प्रत्येकाला आपल्या जीवाची भीती ही वाटतेच. मग तो माणूस असो अथवा एखादे मुके जनावर. आपल्या कुटुंबातील एका सदस्याप्रेमाने त्यांनी तीला पाळले. आणि म्हणूनच तिचा जीव धोक्यात असताना त्यांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. अगदी एखाद्या पिक्चर मध्ये शोभणारी ही घटना.
खडेबाजार येथील एका तीन मजली इमारतीच्या बाल्कनीतून जीव धोक्यात असलेल्या मांजराची सुटका करण्यात आली आहे.चक्क अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे तीन तासांच्या थरारानंतर मांजराची यशस्वी सुटका केली असून नागरिकांनी टाळ्या वाजवून अग्निशमन दलाचे अभिनंदन केले.
पाळलेले पाळीव मांजराचे एक पिल्लू बेळगावच्या खडेबाजार येथील तीन मजली इमारतीच्या बाल्कनीत अडकले. तेथून परत येता न आल्याने त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.खिडकीतून बाल्कनीत उडी मारल्यानंतर मांजर पुन्हा खिडकीत उडी मारू शकले नाही आणि तिला जीवाची भीती वाटत होती. कुटुंबीयांनी मांजरीला वाचविण्याचा प्रयत्न केला पण शक्य झाले नाही.मांजर दोन तास तिथेच म्यांव म्यांव करत अडकून बसली होती.
त्यानंतर मालकाने ऍनिमल वेल्फेअर असोसिएशनच्या सदस्यांना फोन केला. यावेळी वरुण कारखानीस हे सदस्यांसह त्याठिकाणी दाखल झाले. मात्र मांजराला वाचविण्याच्या त्यांच्या प्रयत्नांनाही यश आले नाही. त्यामुळे अखेर या मांजराच्या बचावासाठी अग्निशमन दलाला बोलवावे लागले.
यावेळी मांजराला वाचवण्यासाठी पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान पुढे आले. अग्निशमन दलाचे जवान ट्रक आणि शिडीच्या मदतीने बाल्कनीवर चढले आणि मांजरीला वाचविण्यात यशस्वी झाले.