बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अर्थात बीम्समध्ये पुन्हा सर्व्हर डाऊनची समस्या उद्भवली असून परिणामी उपचारासाठी आलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये रांगेत तासनतास ताटकळत उभे राहावे लागत असल्यामुळे हॉस्पिटल प्रशासना विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आरोग्याच्या तक्रारी घेऊन आलेल्या रुग्णांवर सध्या तासंतास रांगेत ताटकळत उभारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आज सोमवारी सकाळी बीम्स समोर रुग्णांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. सर्व्हर डाऊन असल्याकारणाने रुग्णांसह त्याच्या नातेवाईकांनाही रांगेत ताटकळत थांबावे लागले होते. सर्व्हर डाऊन असल्याने ओपीडीमध्ये नांव नोंदणीसाठी रांगा लावलेल्या रुग्णांवर उपचार न घेताच घरी परतण्याची वेळ आली.
हॉस्पिटलमधील सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे विशेष करून महिला आणि लहान मुलांना त्रास झाला. नांव नोंदणीसाठी आपला नंबर केंव्हा लागतो याची प्रतीक्षा करत महिला आपल्या मुलांसह हॉस्पिटल आवारात निवाऱ्याला बसल्याचे दिसून येत होते.
आपण आज सकाळी लवकर उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलो असून आता दुपार झाली तरीही आमचा नंबर लागलेला नाही. हॉस्पिटलमध्ये उपचारापूर्वी ओपीडी पेपर्स बनवावे लागतात. मात्र सर्व्हर डाऊन असल्याकारणाने आपला नंबर आलाच नाही, असे एका रुग्णाने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शहरासह जिल्ह्यातील विविध भागातील रुग्ण उपचारासाठी येत असतात.
सर्व्हर डाऊन सारख्या समस्यांमुळे परगावहून येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातलगांची मोठी गैरसोय होते. याची गांभीर्याने दखल घेऊन बिम्स प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी. हॉस्पिटलमध्ये डबल काउंटर स्थापन करण्यात यावा, अशी मागणीही रुग्णांकडून केली जात आहे.
पहाटे तीन वाजल्यापासून रांगेत उभा राहणाऱ्या रुग्णांना किती अडचणींचा सामना करावा लागतो याची जाणीव हॉस्पिटल प्रशासनाला असायला हवी. जनतेच्या सोयीसाठी आरोग्य सुरक्षेसाठी असणाऱ्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व्हर डाऊनची समस्या असेल तर यासाठी जनतेने काय करावे? असा संतप्त सवाल रुग्णांनी उपस्थित केला आहे.
खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याची गरीब सर्वसामान्य रुग्णांची ऐपत नसते हे लक्षात घेऊन सर्व्हर डाऊन सारख्या समस्या तातडीने सोडवण्यात याव्यात, अशी मागणी रुग्णांनी केली आहे. बेळगावचे सिव्हिल हॉस्पिटल या ना त्या कारणाने कायम चर्चेत असते असते. नुकत्याच एका मासिकाच्या सर्वेक्षणात बीम्स हॉस्पिटलला देशात 12 वे मानांकन मिळाले आहे. मात्र एकंदर परिस्थिती पाहता प्रत्यक्षात जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अद्यापही बिम्स प्रशासन मागेच असल्याचे दिसून येत.