गेल्या दोन-तीन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील तांगडी गल्ली येथील दोन घरे तर कांगली गल्ली येथील एक घर कोसळले असून या पद्धतीने तीन घरे कोसळल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
गेल्या दोन-तीन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या शनिवारी तांगडी गल्ली येथील पवार आणि मुरकुटे यांची घरे कोसळली. यामुळे एकूण सुमारे 6 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पवार आणि मुरकुटे कुटुंबीयांनी याबाबतची माहिती स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ भातकांडे यांना देऊन मदत करण्याची विनंती केली.
तेंव्हा सिद्धार्थ भातकांडे यांनी तात्काळ मनपा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर पवार आणि मुरकुटे कुटुंबाला नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मनपा अधिकाऱ्यांकडून कोसळलेल्या घरांचे तातडीने सर्वेक्षण करून घेऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली.
तांगडी गल्ली प्रमाणे कांगली गल्ली येथील श्रीधर अन्नी यांचे घरही मुसळधार पावसामुळे कोसळले असून सुमारे 3.5 लाखहून अधिक नुकसान झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते भातकांडे यांनी या ठिकाणी देखील महापालिका अधिकाऱ्यांकडून घराच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून घेण्याबरोबरच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून दिली आहे.
घर कोसळलेल्या संबंधितांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन मनपा अधिकाऱ्यांनी दिल्याचे सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ भातकांडे यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना सांगितले.
पावसामुळे पडझड झालेल्या घरांचा सर्वे सुरू आहे त्यामुळे पीडित कुटुंबांनी नुकसानभरपाई मिळवण्यासाठी भरपाई सर्वे करून घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.