गेल्या आठ दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे बळ्ळारी बळ्ळारी नाला आणि हालगा -मच्छे बायपास परिसरातील शेतजमिनी पाण्याखाली जाऊन पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरा परिसरातील शिवारांमध्ये पाणीच पाणी झाल्यामुळे पेरलेली भातपीकं वाया जाऊन शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
बेळगाव परिसरातील दक्षिण भाग येळ्ळूर रोडपासून सुरु होणारा शेतकऱ्यांचा तारक बळ्ळारी नाला 2013 पासून मारकच ठरलेला आहे. संततधार पावसामुळे यंदा यावेळी देखील या नाल्याचे पाणी मोठ्या प्रमाणात पात्रा बाहेर पडल्यामुळे आसपासच्या शेतजमिनी पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांवर पुराचे संकट कोसळले आहे.
गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या मोठ्या पावसाने पुराची पातळी वाढतच आहे. त्यामुळे आता अनगोळ, येळ्ळूर, वडगाव, शहापूर, धामणे, जुने बेळगाव आणि हलगा येथील शिवारांमध्येही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी या भागातील भात पिके वाया गेल्यात जमा असून यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष करून येळ्ळूर परिसरातील सुप्रसिद्ध बासमती भात पीक पुरामुळे नष्ट झाल्या जमा आहे.
काल रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे पुराचे पाणी चक्क येळ्ळूर रोडवरील केएलई चॅरिटेबल हॉस्पिटलपर्यंत पोहोचले आहे. पुराचे पाणी येळ्ळूर रोडवर येण्यास अर्धा फूट बाकी आहे पावसाचा जोर आज देखील कायम राहिल्यास हा रस्ता उद्यापर्यंत पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे तसे झाल्यास येळ्ळूर गावाचा बेळगावशी असणारा थेट संपर्क तुटणार आहे. या खेरीज मच्छे पासून येळ्ळूर रोडपर्यंत बायपासची मोठ्या प्रमाणात भरती घातल्याने येळ्ळूर, राजहंसगड वारीवरुन येणारे भरपूर पाणी अडल्याने तिथेही ते पाणी बळ्ळारी नाल्याकडे जाण्याची वाटच बंद झाली असल्याने वरच्या बाजूला पुर आला आहे.
दरम्यान, कृषी अधिकाऱ्यांनी यापूर्वी तसेच काल मंगळवारी बळ्ळारी नाला परिसराची पाहणी केली होती. या पद्धतीने कृषी अधिकारी बळ्ळारी नाल्याच्या पुराची समस्या दूर करण्याऐवजी फक्त पाहणी करून जात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या खेरीज हा अधिकारीवर्ग प्रत्यक्ष शेतातील बांधावर जाऊन काम करण्याऐवजी रस्त्यावर दूरवर राहून आपले कर्तव्य बजावत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
बळ्ळारी नाल्यातील गाळ व जलपर्णी काढून त्याची खोली वाढवल्यास तो शेतकऱ्यांसाठी तारक होईल. तथापी कर्नाटक सरकार, जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी परिसरातील शेतकऱ्यांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. बेकायदा हालगा-मच्छे बायपासमुळे परिसरातील पीकंसुध्दा पाण्यात बुडाल्याने दुसरा भुर्दंड पडला आहे.
गेल्या आठ दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने बळ्ळारी बळ्ळारी नाला, बायपास परिसर पुराने बुडाल्याने पेरलेली भातपीकं वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट नक्कीच येणार असल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा एकरी 40/50 हजार कुठून आणायचे ? असा सवाल केला जात आहे. रब्बी पीकंसुध्दा अवकाळी पावसाने गेल्याने मोठा आर्थिक भुर्दंड आणि आता हे पुराचे संकट यामुळे शेतकरी हवालदिल हताश झाला आहे. गेल्यावर्षी जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांच्या प्रयत्नामुळे बळ्ळारी नाला विकासासाठी 800 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला होता.
पण तो हवेतच विरल्याने परिसरातील आश्वासनं देऊन शेतकऱ्यांच्या तोडांला पानं पुसण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. त्याचप्रमाणे सरकारने ठोस पावल उचलून येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देऊन उभारी देण्याची मागणी केली जात आहे. बळ्ळारी नाल्याचे काम थांबले असलेतरी तुर्त पाण्याचा निचरा होण्यासाठी जिथे रस्ते म्हणजे येळ्ळूर, यरमाळ, धामणे, जूनेबेळगाव, धामणे, बस्तवाड, येडियुराप्पा रोडच्या बाजूला जेसीबी, पोकल्याब लावून नाल्यातील गाळ, जलपर्णी काढल्यास थोडातरी पाण्याचा निचरा होत कांही शेतकऱ्यांची पिकंतरी वाचतील, असे जाणकारांचे मत आहे.