नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेयर्स, युनायटेड नेशन्स इंडिया यासह देशातील प्रमुख सहा संस्थांच्या माध्यमातून दिला जाणारा ‘स्मार्ट सोल्युशन्स चॅलेंज अँड इन्क्लुझिव्ह सिटी अवॉर्ड -2022’ हा पुरस्कार बेळगाव स्मार्ट सिटी योजनेला मिळाला आहे.
सदर पुरस्कार तीन प्रवर्गांमध्ये दिला जात असून त्यातील इम्प्लिमेंटेड सोल्युशन्स या प्रवर्गातील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार बेळगाव स्मार्ट सिटीला मिळाला आहे. अर्ली स्टेज इनोव्हेशन्स व रेडी सोल्युशन्स या प्रवर्गात मात्र बेळगावला पुरस्कार मिळालेला नाही.
महिला व दिव्यांगांसाठी स्मार्ट सिटी योजनेतून राबविण्यात आलेली कामे व त्यांचा त्यांना होत असलेला फायदा लक्षात घेऊन बेळगावची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेयर्स या संस्थेने ट्विटद्वारे द्वारे याबाबतची माहिती दिली आहे. या तिन्ही प्रवर्गातील पहिल्या क्रमांकाच्या पुरस्कारासाठी 5 लाख रुपयांची रक्कम दिली जाणार आहे.
दरम्यान, बेळगावची गेल्या जानेवारी 2016 मध्ये स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्याच टप्प्यात निवड झाली आहे. या योजनेतील कामे 2021 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असताना विविध कारणांमुळे अनेक कामे अद्याप अपूर्ण रखडलेली आहेत.
केंद्र शासनाने 2023 पर्यंत या योजनेतील कामे पूर्ण करण्याची डेडलाईन दिली आहे. एकीकडे स्मार्ट सिटी योजनेतील विकास कामांचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रार भ्रष्टाचार निर्मूलन विभागाकडे झाली आहे तर दुसरीकडे या पद्धतीने बेळगाव स्मार्ट सिटी विभागाला पुरस्कारही मिळाला आहे.