Thursday, January 2, 2025

/

‘आप’चा उद्रेक; मनपाला टाळे ठोकण्याचा इशारा

 belgaum

सरकार निवडणुका स्वतःसाठी घेते की जनतेसाठी असा सवाल करत येत्या आठवड्याभरात बेळगाव महापौर उपमहापौर निवडणूक घेण्यात आली नाही तर बेळगाव महापालिकेला टाळे ठोकण्याचा इशारा आम आदमी पार्टीने (आप) दिला आहे. एक तर महापौर -उपमहापौर निवडणूक घ्यावी अन्यथा सर्व नगरसेवकांनी राजीनामे द्यावेत, अशी भूमिका घेत आज गुरुवारी सकाळी आम आदमी पार्टीने महापालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडले.

बेळगाव महापालिकेची निवडणूक होऊन 9 महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. तथापि अद्यापपर्यंत महापौर -उपमहापौर पदाची निवडणूक तर सोडाच पण निवडून आलेल्या नगरसेवकांचा शपथविधी देखील झालेला नाही. यामुळे महापालिकेच्या 58 प्रभागातील विकास कामांवर लक्ष ठेवण्यासाठी कोणी लोकप्रतिनिधीच राहिलेला नाही.

लोकशाही पायदळी तुडवताना सर्व यंत्रणा आमदार महोदय आणि सरकारी अधिकाऱ्यांकडून हाताळली जात आहे. थोडक्यात शहराचा प्रमुख नागरिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापौर निवडीकडे दुर्लक्ष करून लोकशाहीला विसंगत यंत्रणा सध्या बेळगावत कार्यरत झाली आहे. याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीतर्फे आज सकाळी बेळगाव महापालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात आले.

याप्रसंगी बोलो भारत माता की जय, वंदे मातरम, भाजप सरकारचा धिक्कार असो, बेके बेकू न्याया बेकू, आम आदमी जिंदाबाद, मनपाचा धिक्कार असो, मनपा आयुक्तांचा धिक्कार असो आदी घोषणा देण्यात येत होत्या. यावेळी आंदोलनकर्त्यांनी हातात धरलेले भाजप का अंधेरा भगावो आपका उजाला लाओ, भाजप है तो अंधेरा कायम रहेगा, स्मार्ट सिटी डाउन डाउन, या आशयाचे फलक साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते.

आपल्या आंदोलनासंदर्भात बोलताना आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी न्यायालयातील दावावगैरे कारणे सांगून सरकारकडून बेळगाव महापालिका सभागृह अस्तित्वात आणण्यास जाणून बुजून विलंब केला जात आहे. महापौर -उपमहापौर निवडणूक घेण्यास चालढकल करण्याबरोबरच नगरसेवकांचा शपथविधीही अद्याप झालेला नाही. सभागृह अस्तित्वात नसताना परस्पर 470 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे.

नगरसेवक नसताना अशा पद्धतीने परस्पर अर्थसंकल्प मंजूर करून घेणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे असे सांगून सरकारी अधिकारी जर सरकार चालवणार असतील तर मुख्यमंत्री कशाला पाहिजेत? राज्याचे चीफ सेक्रेटरी, अंडर सेक्रेटरी, मनपा आयुक्त यांनीच यापुढे राज्यातील सरकार चालवावे अशी टीका विजय पाटील यांनी केली.

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील प्रभागांमध्ये विविध विकास कामे राबविली जात असून त्यावर कोट्यावधी रुपये खर्च होत आहेत. परंतु हे पैसे कशा पद्धतीने कोठे खर्च केले जात आहेत याची माहिती नगरसेवकांसह कोणालाच नाही. कोणी विचारणारे नसल्यामुळे बेळगाव स्मार्ट सिटी योजनेचा संपूर्ण बोजवारा उडाला आहे. या संदर्भात कोणी जाबही विचारू शकत नाही. कारण सर्वसामान्यांकडे तो अधिकार नाही. एकंदर परिस्थिती पाहता येत्या दोन-तीन दिवसात किंवा आठवडाभरात जर बेळगाव महापौर उपमहापौर पदाची निवड झाली नाही तर बेळगाव महापालिकेला टाळे ठोकले जाईल. पोलीस प्रशासनाचा मान राखून सध्या आम्ही ती कृती करणार नाही. मात्र दिलेल्या अवधीत आमची मागणी पूर्ण केली जावी अन्यथा अटक झाली तरी बेहत्तर आम्ही महापालिकेला टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाही असा निर्वाणीचा इशारा आपचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी दिला. एक तर महापौर उपमहापौर निवडणूक घ्यावी अन्यथा सर्व नगरसेवकांनी राजीनामे द्यावेत असेही ते म्हणाले.Aap protest

लोकशाहीमध्ये निवडणूक राजकीय नेतेमंडळी आणि सरकारी अधिकाऱ्यांसाठी घेतली जाते की जनतेसाठी? असा सवाल याप्रसंगी आंदोलनकर्त्यांनी केला. मागील पावसाळ्यात बेळगाव शहर परिसरात निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीची छायाचित्रे असणारे बॅनर घेऊन उभे असलेल्या या आंदोलकांनी मागील वर्षी आम्ही मनपा आयुक्तांकडे पावसाळ्यात शहरात निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत तक्रार केली होती. त्यावेळी त्यांनी निवडणूक होऊ दे सर्व काही व्यवस्थित करू असे आश्वासन दिले होते. आता महापालिका निवडणूक होऊन 9 महिने उलटून गेले तरी महापौर उपमहापौर निवडणूक झालेली नाही नगरसेवकांच्या शपथविधीचा पत्ता नाही.

अधिकृत दर्जा प्राप्त न झाल्यामुळे नगरसेवक देखील नागरिकांच्या तक्रारींची दखल घेईनासे झाले आहेत. पावसाळ्याला सुरुवात झाली असून आता समस्या निर्माण होणार आहेत त्याचे निवारण कोण करणार? या अन्यायाविरोधात आवाज उठवायचा झाल्यास पोलीस आडकाठी करत आहेत असे सांगून हीच लोकशाही आहे का? असा संतप्त सवाल आंदोलकांनी केला. आजच्या आम आदमी पार्टीच्या या आंदोलनात सर्वसामान्य नागरिकांसह बहुसंख्य कार्यकर्त्यांचा सहभाग होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.