‘मानवतेसाठी योग’ या घोषवाक्याला अनुसार बेळगाव जिल्हा प्रशासनातर्फे सुवर्ण विधानसौध येथे आज 8 वा जागतिक योग दिन अत्यंत अर्थपूर्णरित्या उत्साहात साजरा करण्यात आला.
जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, शिक्षण खाते, महानगरपालिका, पर्यटन खाते, राणी चन्नम्मा विद्यापीठ, स्काऊट आणि गाईड, नेहरू युवा केंद्र व पतंजली योग विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सुवर्ण विधानसौध येथे आज मंगळवारी 8 वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी खासदार मंगला अंगडी, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रामचंद्रगौडा, जिल्हा आयुष अधिकारी श्रीकांत सुनधोळी, शंकरगौडा पाटील यांच्यासह विविध सरकारी खात्यांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योगासन कार्यक्रमात सहभाग दर्शविला होता.
या सर्वांनी ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्ध चक्रासन, त्रिकोणासन, भद्रासन, भुजंगासन, शलभासन उत्तानपादासन अर्ध हलासन आदी विविध योगासनांसह प्राणायामाचे सादरीकरण केले.
राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या योग्य शिक्षिका आणि आंतरराष्ट्रीय योग पंच शाहूनगरच्या आरती संकेश्वरी यांनी या सर्वांना मार्गदर्शन करत योगासने करून घेतली. तसेच त्यांनी उपस्थितांकडून प्रार्थनेसह योग संकल्प करून घेतला. योगासन कार्यक्रमानंतर राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक विजेती बालिका दक्षा बेविनमरद हिने भरत नाट्यम नृत्याद्वारे योगा प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांना चकित केले. यावेळी अथर्व सवणुर याने नाट्य सादर केले. जैन हेरिटेज शाळेच्या विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमानंतर राष्ट्रगीताने जागतिक योग दिन कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सर्वांनी दररोज योगासने करून आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवले पाहिजे असे सांगून सर्वांनी आपले आरोग्य सुदृढ -तंदुरुस्त ठेवून सुदृढ देशाच्या निर्मितीस हातभार लावावा, असे आवाहन केले. शहरातील प्रतिष्ठित नागरिक, विविध खात्यांचे अधिकारी, राणी चन्नम्मा विद्यापीठाचे प्राध्यापक -विद्यार्थी, स्काऊट व गाईड कॅडेट, सेवादल कार्यकर्ते, नेहरू युवा केंद्र आणि पतंजली योग समितीचे सदस्य, पदाधिकारी आदींसह 100 हून अधिक जणांनी सुवर्ण विधानसौध येथील योग कार्यक्रमात सहभाग दर्शविला होता.