रोहयो अंतर्गत कामाचा दैनंदिन पगार व्यवस्थितपणे आपल्या खात्यावर जमा केला जावा, या मागणीसाठी आंबेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या महिलांनी आज गुरुवारी तालुका पंचायत कार्यालयासमोर निदर्शने करून आंदोलन छेडले.
आंबेवाडी ग्रामपंचायत हद्दीत राबविण्यात येणाऱ्या रोजगार हमी योजने अंतर्गत कामाचा पगार देताना अन्याय केला जात आहे, तो व्यवस्थित दिला जात नसल्याच्या निषेधार्थ गुरुवारी या योजनेतील कामगार महिलांनी तालुका पंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडले.
आंबेवाडी ग्रा. पं. हद्दीतील महिलांना रोजगार हमी योजनेची कामे करण्यासाठी रोजचा दैनंदिन पगार 320 रुपये ठरविण्यात आहे. त्यानुसार दर आठवड्याला किमान 2100 रुपये पगार मिळावयास हवा मात्र प्रत्यक्षात कामगार महिलांच्या हातावर 400 -500 रुपये टेकविले जात आहेत. याबाबत तक्रार केल्यास त्याची दखल घेतली जात नाही असे सांगून आम्ही सकाळी 8 वाजता कामावर हजर राहून देखील आमची हजेरी व्यवस्थित भरून घेतली जात नाही, असे नगोशा नागू मन्नोळकर या महिलेने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
सरकारने गरिबांच्या पोटासाठी हा रोजगार काढलाय म्हणून लोक राबवून खाण्यासाठी या कामावर जातात. मात्र कामाचे सात दिवस भरलेले असताना तीन दिवसांचा पगार काढला जातो हा अन्याय आहे. असे सांगून इतर ग्रामपंचायतींप्रमाणे आम्हाला आमचा पगार व्यवस्थित मिळालाच पाहिजे, अशी मागणी अन्य एका वयस्क कामगार महिलेने यावेळी बोलताना केली.
मिळालेल्या माहितीनुसार आंबेवाडी ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांकडून (पीडीओ) रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या महिला कामगारांचा पगार व्यवस्थित देण्याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. आठवडाभर घाम गाळून श्रमाचे काम करणाऱ्या या महिलांना त्यांच्या कामाचा मोबदला अर्थात पगार व्यवस्थित देण्याऐवजी थातुर मातूर कारणे सांगून तुटपुंजा पगार दिला जात आहे.
यामुळे संतप्त झालेल्या संबंधित महिलांनी आज गुरुवारी थेट तालुका पंचायत कार्यालय गाठून त्या ठिकाणी निदर्शने करत आंदोलन छेडले. दरम्यान, राबून खाणाऱ्या या महिलांच्या बाबतीत जो अन्याय होत आहे तो पाहता आंबेवाडी येथील रोजगार हमी योजनेत कांही भ्रष्टाचार तर सुरू नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे.