हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांना भेटण्यास येणाऱ्या नातेवाईकांना आता त्यांच्याशी थेट समोरासमोर संभाषण करता येणार नाही, त्याऐवजी भेट कक्षात साऊंड प्रुफ काचेतून एकमेकांकडे पहात लँडलाईन फोनद्वारे बोलण्याची व्यवस्था कारागृह प्रशासनाने केली आहे.
बेळगावचे हिंडलगा मध्यवर्ती कारागृह हे बेंगलोर येथील परप्पन अग्रहार कारागृहा नंतरचे राज्यातील सर्वात अतिसुरक्षित कारागृह म्हणून ओळखले जाते. या कारागृहांमध्ये कुविख्यात कैद्यांसह इतर वेळा प्रकरणातील कैदी बंदिस्त आहेत.
गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचे संकट गडद झाल्याने कारागृहातील कैद्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी कारागृह प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. नवीन प्रकरणात कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या कैद्यांना कांही दिवस देखरेखीखाली वेगळ्या बराकीत ठेवल्यानंतर कोरोनाची लक्षणे न आढळून आल्यास त्यांना मूळ बराकीत पाठविण्यात येत होते. तसेच प्रवेशद्वारावर सॅनिटेशन मशीन बसविण्यात आली होती.
या आधी कारागृहात कैद्यांना भेटण्यास येणाऱ्या नागरिकांकडून ओळखपत्र घेतल्यानंतर कैद्याना भेट कक्षात जाळीच्या खिडकीतून समोरासमोर बोलण्यास दिले जात होते. मात्र आता या खिडकीमध्ये जाळी ऐवजी साऊंड प्रूफ काच बसवण्यात आली आहे. त्यामुळे थेट संभाषण करणे ऐवजी आता कैदी आणि नातेवाइकांना खुर्चीवर बसून लँडलाईन फोनच्या माध्यमातून संभाषण करण्याची सोय करण्यात आली आहे.
नातेवाईक आणि कैद्यांना केवळ एकमेकांचे चेहरे पाहून फोनच्या माध्यमातून बोलता येणार आहे. त्याचबरोबर भेटण्यासाठी येणाऱ्या यासंबंधीतांचे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. त्याचबरोबर कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्याच्या प्रमाणपत्राची झेरॉक्सही सादर करणे बंधनकारक आहे.