तिसरे रेल्वे फाटक टिळकवाडी येथील शहरातील चौथ्या उड्डाणपुलाचे गर्डर बसून जवळपास दीड महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर आता या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे लवकरच तिसऱ्या रेल्वे फाटकावरील उड्डाणपूल लवकरच बेळगावकरांच्या सेवेत रुजू होणार आहे.
गेल्या चार वर्षापासून तिसरे रेल्वे गेट येथील उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र सुरुवातीपासूनच हे काम अतिशय संथ गतीने सुरू होते. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या वारंवार निर्माण होत होती. कोरोनाच्या संकटामुळे या पुलाचे काम अनेक दिवस बंद ठेवण्यात आल्यामुळे उड्डाणपूल बांधून पूर्ण होण्यास अधिकच विलंब झाला.
यासंदर्भात सिटीझन कौन्सिलसह अन्य संघटनांनी आवाज उठवल्यामुळे गेल्या कांही महिन्यांपासून पुलाचे काम वेगाने हाती घेण्यात आले होते. स्पॅन व गर्डर बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर एप्रिल अखेरपर्यंत पूल वाहतुकीसाठी सुरू केला जाईल, अशी माहिती त्यावेळी देण्यात आली होती.
शहरातील गोगटे सर्कल मार्ग, कपलेश्वर मार्ग व जुना पी. बी. रोड या ठिकाणच्या उड्डाणपूलानंतर बेळगावात होणारा हा चौथा उड्डाणपूल आहे. खासदार मंगला अंगडी यांनीही रेल्वे अधिकाऱ्यांना पुलाचे काम वेळेत पूर्ण करण्याची सूचना केली होती.
गेल्या दीड महिन्यापूर्वी गर्डर बसवण्यात आल्यानंतर पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण होईल अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती. तथापि मे महिना उलटून जून महिना सुरू झाला तरी पुलाचे काम पूर्ण झाले नव्हते. आता सदर काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच तिसऱ्या रेल्वे फाटकावरील उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे.