राज्यात गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने खबरदारी म्हणून सिव्हीयर ॲक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शन अर्थात सारीचे संशयित रुग्ण आणि व्याधिग्रस्तांची कोरोना चांचणी करण्याचा आदेश आरोग्य खात्याने बजावला आहे.
बेळगाव जिल्ह्यासह राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. बाधितांच्या आकड्यात वाढ होऊन सक्रिय रुग्णांची संख्या वाढत आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाच्या पातळीवर नियोजन सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून चांचण्या वाढविल्या जात आहेत. यासाठी सारी संशयित रुग्ण आणि व्याधिग्रस्तांची प्राधान्याने चांचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आजारी, शस्त्रक्रिया झालेल्या तसेच गंभीर आजारी व्यक्तींनी काळजी घेण्याबाबत कळविण्यात आले आहे. गर्भवती महिला आणि प्रस्तुत महिला यांनाही आजारामुळे धोका पोचण्याची शक्यता असते.
यासाठी आरोग्य विभागाने संबंधित व्यक्तींनी वेळेत लस आणि बुस्टर डोस घ्यावा अशी सूचना केली आहे. तसेच शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, घराबाहेर जाताना फेस मास्क आवर्जून परिधान करावा अशी सूचनाही केली आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटे नंतर कोरोना हद्दपार झाल्याचे मानले जात होते. त्यामुळे त्यासंबंधीचे निर्बंध व नियम शिथिल करण्यात आल्याची घोषणा केली गेली. मात्र मागील दोन ते तीन आठवड्यांपासून कोरोना पुन्हा आपले पाय पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यासाठी आरोग्य खात्याकडून जनतेला पुनश्च एकदा खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.