Saturday, April 27, 2024

/

फाटकावर रेल्वे थांबवू नये; डीआरएम यांची सूचना

 belgaum

बेळगाव शहरातील रेल्वे फाटकांवर बराच काळ रेल्वे थांबण्याच्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या प्रकारांचा फटका वाहनधारक व पादचार्‍यांना बसत असून गेल्या शनिवारीही टिळकवाडीतील दुसऱ्या रेल्वे फटकाच्या ठिकाणी थांबलेल्या रेल्वे खालून विद्यार्थ्यांनी ये-जा करण्याचा जीवघेणा प्रकार घडला आणि त्याची नैऋत्य रेल्वेने गंभीर दखल घेतली आहे. रेल्वेच्या हुबळी येथील डीआरएम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याकडे लक्ष देण्याच्या सूचना केल्या आहेत.

टिळकवाडी येथील दुसऱ्या रेल्वे फाटकावर गेल्या शनिवारी 11 जून रोजी एक मालवाहू रेल्वे गाडी अचानक थांबली. त्यावेळी त्या रेल्वे खालून कांही विद्यार्थ्यांनी धोकादायकरीत्या ये -जा केली. हा विषय शहरात चर्चेचा बनला होता, शिवाय या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर बेळगाव शहर वाहतूक पोलिसांनी आपल्या ट्विटर आयडीवरून रेल्वेचे जीएम आणि नैऋत्य रेल्वे हुबळीच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना (डीएमआर) याकडे लक्ष देण्याची विनंती केली होती. तसेच टिळकवाडीतील पहिल्या व दुसऱ्या रेल्वे फाटका वरून रेल्वे गाड्या लवकर जाव्यात अशी उपाययोजना करण्याची विनंती केली होती.

पोलिस प्रशासनाच्या विनंतीची दखल घेत हुबळी येथील रेल्वेच्या डीआरएम यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. शहरातील कोणत्याही रेल्वे फाटकावर रेल्वे थांबू नये याची काळजी घ्यावी, असे डीआरएम यांनी स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे रेल्वे रुळावर रेल्वे थांबली असता कोणत्याही व्यक्तीने मधून ये-जा करू नये. रेल्वे गेल्या नंतर फाटक खुले होईल त्यानंतरच ये -जा करावी, अशी सूचनाही नैऋत्य रेल्वेच्या डीआरएम यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.