प्रादेशिक विमानतळ (डोमेस्टिक एअरपोर्ट) आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ (इंटरनॅशनल एअरपोर्ट) सर्वस्वी भिन्न असते. बेळगाव येथील विमानतळ हे प्रादेशिक आहे. त्यामुळे कित्तूर येथे होणाऱ्या प्रस्तावित संभाव्य आंतरराष्ट्रीय विमानतळाचा बेळगाव विमानतळावर कोणताही परिणाम होणार नाही, असे जाणकारांचे मत आहे.
राज्याचे उद्योगमंत्री मुरगेश निराणी यांनी कित्तुरला आंतरराष्ट्रीय विमानतळ बनवू असे वक्तव्य केल्यानंतर कित्तुर विमानतळा बाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.
बेळगाव विमानतळाचा प्रगतीचा आलेख गेल्या काही महिन्यांपासून उंचावत आहे. या विमानतळावरुन ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे. देशातील स्टार एअर, इंडिगो, ट्रू जेट, अलाईन्स एअर सारख्या मोठ्या विमान कंपन्यांच्या विमान फेऱ्यांमुळे बेळगाव आज देशातील महत्त्वाच्या मोठ्या शहरांना जोडले गेले आहे. सध्याच्या घडीला प्रवासी संख्येच्या बाबतीत राज्यात बेंगलोर आणि मंगळूर नंतर बेळगाव विमानतळ तिसऱ्या क्रमांकावर आहे. या पार्श्वभूमीवर कित्तूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी केली जाणार आहे.
हे विमानतळ झाल्यास त्याचा विपरीत परिणाम बेळगाव विमानतळाच्या प्रगती -उत्कर्षावर होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र जाणकारांच्या मते बेळगाव विमानतळ आणि कित्तूर आंतर राष्ट्रीय विमानतळ सर्वस्वी भिन्न असणार आहेत. बेळगावचे विमानतळ हे प्रादेशिक असून येथे येणारी विमाने, प्रवासी सर्व कांही वेगळे असणार आहे. कित्तूर येथे आं. रा. विमानतळ उभारण्याचे कारण गोवा येथे प्रवाशांची गर्दी होत आहे.
वाढती वाहनसंख्या, पार्किंगची समस्या आणि जागेचा अभाव यामुळे गोव्यात ठिकाणी आणखी एक आंतरराष्ट्रीय विमानतळ होऊ शकत नाही. याचा विचार करून गोवा आणि बेंगलोरशी समांतर असे विमान लँडिंग, पार्किंग आदी सर्वदृष्टीने अनुकूल असणाऱ्या कित्तूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार आहे. तसेच पाहता दोन रिजनल विमानतळाच्यामध्ये एक आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याची केंद्र सरकारची योजना आहे असेेेही बोलले जात आहे.
बेंगलोर, गोवा, हैद्राबाद, कोल्हापूर यांच्यासाठी कित्तूर येथील विमानतळ अनुकूल होणार आहे. यासाठी वैज्ञानिक समितीच्या सल्ल्यानुसार कित्तूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी केली जाणार आहे. थोडक्यात या विमानतळामुळे बेळगाव विमानतळाच्या कार्यप्रणालीवर कोणताच परिणाम होणार नसल्याचे सांगितले जात आहे.