बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे येत्या मंगळवार दि. 12 आणि बुधवार दि. 13 जुलै 2022 रोजी मराठा लाईट इन्फंट्रीच्या माजी सैनिक आणि टीए पर्सनल यांच्यासाठी सोल्जर जनरल ड्युटी आणि सोल्जर क्लार्क या पदांसाठी डीएससी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर भरती मेळाव्यासाठीचे पात्रता निकष पुढील प्रमाणे आहेत. उमेदवाराने मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये सेवा केलेली असावी. मागील सेवेतून निवृत्त होताना उमेदवाराला ‘अनुकरणीय’ अथवा ‘अत्युत्तम’ असा शेरा मिळालेला असावा. मागील सेवा काळात दोन पेक्षा अधिक लाल शाईचा शेरा मिळालेला नसावा.
सक्रिय सेवेत लष्करी कायदा कलम 34, 35, 36, 37 व 41 (2) अन्वये शिक्षा झालेली नसावी. मागील सेवेच्या शेवटच्या तीन वर्षात लाल शाईचा शेरा नसावा. त्याचप्रमाणे किमान 5 वर्षे तिरंग्याची सेवा केलेली असावी. सदर मेळाव्याद्वारे उमेदवारांचा लष्करातील पुनर्प्रवेश पूर्वीच्या सेवेतून मुक्त झालेल्याच्या दोन वर्षाच्या आतील असावा.
उमेदवार मागील सेवेतून सेवाकाळ पूर्ण करून अथवा स्वेच्छेने सेवानिवृत्त झालेला असावा. उमेदवाराची शैक्षणिक पात्रता मॅट्रिक अर्थात दहावी उत्तीर्ण अथवा नॉन मॅट्रिकसाठी एसीई lll असावी. वयोमर्यादा सोल्जर जनरल ड्युटीसाठी 46 वर्षाखालील आणि सोल्जर क्लार्क पदासाठी 48 वर्षे असली पाहिजे. उमेदवारांनी भरती मेळाव्याला येताना पुढील कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. ओरिजनल डिस्चार्ज बुक, सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे, राज्य अधिकृत स्वाक्षरीकर्त्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला,
चारित्र्याचा दाखला, कुटुंबाचे छायाचित्र, आर्मी ग्रुप इन्शुरन्स सर्टिफिकेट, सर्व मूळ प्रमाणपत्रांचे दोन सेट, 15 पासपोर्ट आकाराचे फोटो आणि जिल्हा पोलीस प्रमुखांचे व्हेरिफिकेशन सर्टीफिकीट, पीपीओ आणि एटीसी फक्त टीए पर्सनलसाठी.
सदर भरती मेळाव्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी मंगळवार दि. 12 जुलै रोजी सकाळी 7 वाजता मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव येथे उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.