बेळगाव शहरातील गणाचारी गल्ली, बकरी मंडई येथील नूतन श्री खंडोबा मंदिर बांधकामाचा भूमिपूजन समारंभ आज गुरुवारी आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
गणाचारी गल्लीतील बकरी मंडई येथील श्री खंडोबा मंदिराच्या ठिकाणी आयोजित भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी आमदारांचा दीपक गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार ॲड. अनिल बेनके म्हणाले की, बेळगावमध्ये खाटीक समाजाचे वास्तव्य अनेक वर्षांपासूनचे आहे.
खाटीक समाजाचे कुलदैवत श्री खंडोबा असल्यामुळे या समाजाची अनेक वर्षापासूनची श्री खंडोबाचे मंदिर बांधण्याची इच्छा होती. त्यामुळे सर्व खाटीक समाजातील प्रमुख मंडळींच्या उपस्थितीत आज या मंदिराच्या बांधकामाला भूमिपूजनाद्वारे चालना देताना मला आनंद होत आहे.
आता लवकरात लवकर मंदिराचे हे बांधकाम पूर्ण करण्यात येईल. सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात येईल, असे आमदार ॲड. बेनके यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी खाटीक समाजाचे अध्यक्ष उदय गोडके, दिपक गायकवाड, दामोदर भोरडे, प्रकाश महागांवकर, सुधीर गोडके, अशोक कांबळे, धनंजय गोडके, दीपक शेटके, चंद्रकांत बेळगांवकर, सुनील बेळगांवकर, सिद्धू काळगे, सतीश गोडके तसेच संचालक मंडळ व समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.