मुंबई : शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळावे, या मागणीसाठी पोहरादेवीच्या महंतांनी आज थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. संजय राठोडांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देऊन आमच्या समाजाला न्याय द्या, अशी आर्त मागणी बंजारा समाज महंतांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी राठोडांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देणार असल्याचा शब्द दिल्याची माहिती पोहरादेवीच्या महंतानी दिला आहे. त्यामुळे आता राठोडांचे मंत्रिमंडळातील ‘कमबॅक’ निश्तित मानले जात आहे.
पोहरादेवी येथील महंत बाबूसिंग राठोड त्याचप्रमाणे मेहताब सिंग नाईक, अॅड. अभय राठोड, पोपट चव्हाण व बंजारा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वीच राठोडांवरील आरोपांबाबत पोलीस अहवालाच्या मागणीसाठी पोहरादेवी संस्थानचे सहा महंत पुण्याच्या पोलीस आयुक्तांना भेटले होते. या भेटीत पुणे पोलिस आयुक्तांनी संजय राठोड निर्दोष असल्याची माहिती दिली असल्याचा दावा महंतानी केला होता. त्यामुळे लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेवून राठोड यांना पुन्हा मंत्रीपद द्यावे, अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार त्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
या भेटीबाबत बोलताना महंत बाबूसिंग महाराज म्हणाले की, संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यात यावे, यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो. समाजाच्या भावना लक्षात घेवून मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान देण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती महंतांनी दिली.
*पोहरादेवीच्या विकासाला गती मिळणार*
देशातील संपूर्ण बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी या तीर्थक्षेत्राच्या विकास कामास गती द्यावी आणि त्याचा कालबध्द आढावा घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी शुक्रवारी दिल्या. पोहरादेवी तीर्थक्षेत्राचे काम रखडता कामा नये. वेळच्या वेळी यासाठी निधी दिला जात असला तरी कालबध्द रीतीने कामे पण पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सिताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदींची उपस्थिती होती.