बेळगाव जिल्हाधिकारी (डीसी) कार्यालय आवारामध्ये आज सकाळी युद्धपातळीवर अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेऊन गेल्या कित्येक वर्षापासून तेथे असलेल्या अनाधिकृत चहाच्या टपऱ्या, पानपट्टीसह इतर दुकानांच्या टपऱ्या हटविण्यात आल्या. परिणामी दुकान आणि टपऱ्यानी गजबजलेल्या जागा रिकाम्या होऊन जिल्हाधिकारी कार्यालय आवाराने मोकळा श्वास घेतला.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारात गेल्या कित्येक वर्षापासून अनेकांनी चहाच्या टपऱ्या, पानपट्टी तसेच अन्य दुकाने टाकून आपला व्यवसाय थाटला होता. सदर दुकाने आणि टपऱ्यामुळे सरकारी जागा व्यापली जाण्याबरोबरच रहदारीस देखील अडथळा निर्माण होत होतं. याची गांभीर्याने दखल घेऊन आज शुक्रवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात युद्धपातळीवर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेद्वारे आवारातील अनाधिकृत चहाच्या टपऱ्या, पानपट्टीची दुकाने तसेच अन्य दुकानांची खोकी हटविण्यात येऊन जागा रिकाम्या करण्यात आल्या. परिणामी दुकानं व टपऱ्यांमुळे काहीसे बकाल स्वरूप प्राप्त झालेला जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील परिसर स्वच्छ मोकळा वाटत होता.
दरम्यान, पूर्वसूचना न देता करण्यात आलेल्या सदर कारवाईबद्दल संबंधित टपऱ्या व दुकान चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करून आक्षेप नोंदवला. त्यावर अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील मोकळी जागा दिसेल त्या ठिकाणी दुकाने व टपर्या टाकून व्यवसाय थाटल्यामुळे निर्माण होत असलेल्या समस्यांची माहिती देऊन त्यांची समजूत काढली.
त्याचप्रमाणे ज्यांच्या टपर्या व दुकाने हटविण्यात आली आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय आवारातच स्वतंत्रपणे एका बाजूला व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
त्यासाठी आवारातील ज्यांची दुकाने व टपऱ्या हटविण्यात आल्या आहेत त्यांची यादी तयार करून देण्याची सूचनाही त्यांनी केली. एकंदर अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवाराने आज मोकळा श्वास घेतल्याचे जाणवत होते.